दिशा सालियनच्या एफआयआरमध्ये आदित्य, उद्धव ठाकरेंचं नाव आहे का? नितेश राणेंचा मोठा दावा काय?
दिशा सालियन प्रकरणाच्या एफआयआरमध्ये उद्धव आणि आदित्य ठाकरेंचं नाव नसल्याचं नितेश राणेंनी स्पष्ट केलं आहे. सतीश सालियन यांनी आपल्या निवेदनात या नावांचा उल्लेख केला होता, पण एफआयआरमध्ये नाही. नितेश राणेंनी त्यांच्याकडील 'पेन ड्राइव्ह' योग्य ठिकाणी पोहोचल्याचे सूचित केले.

दिशा सालियन प्रकरणाचा सीबीआयने तपास सुरू केला आहे. सीबीआयने या प्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. या एफआयआरमध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचं नाव असल्याचं सांगितलं जात आहे. त्यावरून राज्यातील राजकारण तापलं आहे. उद्धव ठाकरे यांनी तर आमचं चारित्र्य हनन करणं थांबवा. नाही तर कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा लागेल, असा इशाराच दिला आहे. मात्र, खरोखरच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचं नाव एफआयआरमध्ये आहे का? असा सवाल केला जात आहे. त्यावर राज्याचे मंत्री आणि भाजपचे नेते नितेश राणे यांनी थेट शब्दातच उत्तर दिलं आहे.
मंत्री नितेश राणे यांनी टीव्ही9 मराठीशी खास संवाद साधला. यावेळी त्यांना उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचं नाव एफआयआरमध्ये आहे का? असा थेट सवाल करण्यात आला. त्यावर त्यांनी नाही असं उत्तर दिलं. एफआयआरमध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचं नाव नाहीये. माझ्या मुलीचा जीव गेला. त्याला काही लोक कारणीभूत आहेत. त्यामुळे त्यांची चौकशी करण्यात यावी, असं सतीश सालियन यांनी स्टेटमेंट देताना म्हटलं आहे. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख केला होता, असं सांगतानाच मी काही सालियन कुटुंबीयांचा प्रवक्ता नाही, असं नितेश राणे म्हणाले.
पेन ड्राइव्ह जिथे पाहिजे तिथे…
तुमच्याकडे या प्रकरणातील एक पेन ड्राइव्ह होता. त्याचं काय झालं? असा सवालही त्यांना करण्यात आला. हा पेन ड्राइव्ह जिथे पोहोचायला हवा, तिथे पोहोचला आहे, असं सूचक विधान नितेश राणे यांनी केलं. पण हा पेन ड्राइव्ह नेमका कुठे पोहोचवला याची माहिती देण्यास मात्र त्यांनी नकार दिला.
राजकीय रंग नको
दिशा सालियनची केस सुरू होणार आहे. ती राजकीय केस नाही. एका मुलीची हत्या आणि बलात्कार झाला आहे. एका आईवडिलांनी त्यांची मुलगी गमावली आहे. या प्रकरणाला कुणीही राजकीय रंग देऊ नये. कोर्टात ही केस आहे. सीबीआय चौकशी करत आहे. आपण त्यावर बोलू नये. चौकशीत अडथळा आणू नये, असं माझं मत आहे. चौकशी सुरू आहे. ती सुरू राहू द्यावी. निष्पक्ष चौकशी होत आहे, असंही ते म्हणाले.
