IND vs BAN : कॅप्टन रोहित शर्माचं ऐतिहासिक ‘शतक’, बांगलादेशविरुद्ध विजय मिळवताच इतिहास घडवला
Rohit Sharma : भारतीय क्रिकेट संघाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत विजयी सलामी केली. टीम इंडियाने बांगलादेशवर 6 विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह कर्णधार रोहित शर्मा याने ऐतिहासिक शतक केलं.

भारतीय क्रिकेट संघाने 20 फेब्रुवारीला रोहित शर्मा याच्या नेतृत्वात आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत विजयी सलामी दिली. टीम इंडियाने दुबईत झालेल्या बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात 4 विकेट्सने विजय मिळवला. बांगलादेशने विजयासाठी दिलेलं 229 धावांचं आव्हान टीम इंडियाने 4 विकेट्स गमावून पूर्ण केलं. टीम इंडियाच्या या विजयासह कर्णधार रोहित शर्माने खास विक्रम केलाय. रोहितने ऐतिहासिक शतक पूर्ण केलं. रोहितच्या नेतृत्वातील भारताचा हा 100 वा आंतरराष्ट्रीय विजय ठरला. रोहित यासह ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग याच्या विक्रमाची बरोबरी केली. रोहित वेगवान 100 आंतरराष्ट्रीय विजय मिळवणारा रिकी पॉन्टिंगनंतर दुसरा कर्णधार ठरला. रोहितने कर्णधार म्हणून 139 सामन्यांमध्ये 100 वा आंतरराष्ट्रीय विजय मिळवला. तर रोहित 33 सामन्यांमध्ये कर्णधार म्हणून भारतीय संघाला विजयी करण्यात अपयशी ठरला. मात्र यानंतरही रोहितने भारताच्या अनेक माजी कर्णधारांना मागे टाकलं आहे.
कर्णधार रोहितची विजयी टक्केवारी
रोहितची कर्णधार म्हणून विजयी टक्केवारी ही 73 इतकी आहे, जी इतर कोणत्या दुसऱ्या कॅप्टनच्या तुलनेत सर्वाधिक आहे. रोहितने विजयी टक्केवारीबाबत ऑस्ट्रेलियाची दिग्गज कर्णधार रिकी पॉन्टिंग आणि स्टीव्ह व्हॉ या दोघांना मागे टाकलं आहे. पॉन्टिंगने त्याच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाला 324 पैकी 220 सामन्यांमध्ये विजयी केलं. पॉन्टिंगची विजयी टक्केवारी ही 67.90 इतकी आहे. तर वॉ याने 66.25 टक्केवारीसह 163 पैकी 108 सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला होता.
हॅन्सी क्रोनिएचा रेकॉर्ड ब्रेक
रोहितने यासह दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज कर्णधार हॅन्सी क्रोनिए याला मागे टाकलं. हॅन्सी क्रोनिए याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विजयी टक्केवारी ही 65.96 इतकी होती. हॅन्सी क्रोनिए याने 191 पैकी 126 सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला होता. तर भारताचा माजी कर्णधार विराट कोहली याने 213 पैकी 137 सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला होता. तर वेस्ट इंडिजच्या क्लाईव्ह लॉयड यांनी 158 पैकी 100 सामन्यांमध्ये विजयी केलं होतं.
रोहित अशी कामगिरी करणारा पहिलाच
रोहितने 12 कसोटी,38 एकदिवसीय आणि 50 टी 20i असे मिळून 100 आंतरराष्ट्रीय सामने जिंकले आहेत. रोहितला वयाच्या तिशीनंतर नेतृत्वाची जबाबदारी मिळाली. तर रिकी पॉन्टिंगला वयाच्या 28 व्या वर्षी कर्णधार करण्यात आलं होतं. रोहितने वयाच्या तिशीनंतरही 100 सामने जिंकणारा पहिला कर्णधार ठरला.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव.
बांगलादेश प्लेइंग ईलेव्हन : नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तांझीद हसन, सौम्या सरकार, तॉहिद हृदॉय, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), मेहदी हसन मिराज, जाकेर अली, रिशाद हुसेन, तन्झीम हसन साकिब, तस्किन अहमद आणि मुस्तफिजुर रहमान.
