
टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात थरारक आणि श्वास रोखून धरायला भाग पाडणाऱ्या आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत उपांत्य फेरीतील सामन्यात इंग्लंडवर सनसनाटी असा विजय मिळवला आहे. टीम इंडियाने या विजयासह आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली आहे. टीम इंडियाने मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात इंग्लंडसमोर 254 रन्सचं अवघड आणि डोंंगराएवढं आव्हान ठेवलं होतं. त्यामुळे टीम इंडिया हा सामना मोठ्या फरकाने जिंकेल असं चाहत्यांना वाटत होतं. मात्र इंग्लंडनेही शेवटच्या बॉलपर्यंत झुंज दिली. विल जॅक्स याने शतक ठोकून इंग्लंडला सामन्यात कायम ठेवलं होतं. मात्र इंग्लंडचे प्रयत्न अपुरे पडले. इंग्लंडला भारतासमोर विजयी धावांचा पाठलाग करताना 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 246 रन्सपर्यंतच पोहचता आलं. भारताने अशाप्रकारे हा सामना जिंकला.
टीम इंडियाची ही अंतिम फेरीत पोहचण्याची सलग दुसरी आणि एकूण चौथी वेळ ठरली. आता टीम इंडिया अंतिम फेरीत 8 मार्चला वर्ल्ड कप ट्रॉफीसाठी न्यूझीलंड विरुद्ध भिडणार आहे. हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे.
इंग्लंडला जिंकवण्यासाठी जेकब बेथल याने रक्ताचं पाणी केलं. या युवा खेळाडूने या विक्रमी धावांचा पाठलाग करताना चाबूक शतक झळकावलं. त्यामुळे इंग्लंड हा सामना जिंकेल, असं चित्र होतं. मात्र इंग्लंड अपयशी ठरली. बेथलने 48 बॉलमध्ये 7 सिक्सच्या मदतीने सर्वाधिक 105 रन्स केल्या. तर इतरांनीही योगदान दिलं. मात्र इंग्लंड अहमदाबादला अंतिम फेरितील सामना खेळण्यासाठी पोहचण्यात अपयशी ठरली.
भारतासाठी ऑलराउंडर हार्दिक पंड्या याने सर्वाधिक 2 विकेट्स मिळवल्या. तर जसप्रीत बुमराह याने अखेरच्या निर्णायक क्षणी चिवट बॉलिंग केली. हार्दिक व्यतिरिक्त बुमराह, अर्शदीप सिंह, शिवम दुबे आणि वरुण चक्रवर्ती या चौघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.
त्याआधी इंग्लंडने ट़ॉस जिंकून भारताला बॅटिंगसाठी भाग पाडलं. भारताने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 253 धावा केल्या. टीम इंडियाने यासह वेस्ट इंडिज संघाला मागे टाकत आयसीसी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासातील बाद फेरीच्या सामन्यात सर्वोच्च धावंख्येचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडीत काढला. टीम इंडियासाठी संजू सॅमसन याने सर्वाधिक 89 धावा केल्या. शिवम दुबे याने 43 रन्सचं योगदान दिलं. इशान किशन याने 39 रन्स जोडल्या. हार्दिक पंड्या याने 27 तर तिलक वर्मा याने 21 रन्स जोडल्या. तर इतरांनीही योगदान दिलं. इंग्लंडसाठी आदिल रशीद आणि विल जॅक्स या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर जोफ्रा आर्चर याने 1 विकेट मिळवली.