IND vs ENG: 378 धावांचं मोठं टार्गेट देऊनही टीम इंडियाचा लज्जास्पद पराभव का? त्यामागची तीन कारणं

IND vs ENG: 15 वर्षानंतर चालून आलेली मालिका विजयाची संधी दवडली. त्याशिवाय इंग्लंडने पिछाडीवरुन येत मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली. भारतीय संघाचा पराभव का झाला ? त्यामागे काय कारणं आहेत, ते समजून घेऊया.

IND vs ENG: 378 धावांचं मोठं टार्गेट देऊनही टीम इंडियाचा लज्जास्पद पराभव का? त्यामागची तीन कारणं
jonny bairstow-joe root
दीनानाथ मधुकर परब, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Jul 05, 2022 | 5:44 PM

मुंबई: एजबॅस्टन कसोटीत (edgbaston test) भारतीय संघाचा (Indian Team) दारुण पराभव झाला आहे. हा पराभव अत्यंत धक्कादायक आहे. कारण पहिले तीन दिवस टीम इंडिया कसोटी सामना जिंकेल, अशा स्थिती मध्ये होती. भारताला पहिल्या डावात 132 धावांची चांगली आघाडी मिळाली होती. इंग्लिश वातावरणात (English Conditions) इतकी आघाडी भरपूर झाली. त्यानंतर विजयासाठी थोड थोडकं नव्हे, तब्बल 378 धावांच लक्ष्य दिलं होतं. पहिल्या डावात भारताने इंग्लंडला 284 धावांवर रोखलं होतं. त्यामुळे दुसऱ्याडावात भारतीय गोलंदाज या धावसंख्येचा बचाव करतील, असाच सर्वांना विश्वास होता. पण असं घडलं नाही. डोंगराएवढ वाटणारं विशाल लक्ष्य इंग्लंडच्या संघाने अत्यंत सहजतेने पार केलं. भारतीय गोलंदाजांना नेमकं झालं तरी काय? असा प्रश्न पडला होता. भारताने हा कसोटी सामना गमावून 15 वर्षानंतर चालून आलेली मालिका विजयाची संधी दवडली. त्याशिवाय इंग्लंडने पिछाडीवरुन येत मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली. भारतीय संघाचा पराभव का झाला ? त्यामागे काय कारणं आहेत, ते समजून घेऊया.

  1. भारताच्या पराभवाचं मूळ शोधायला गेल्यास, फलंदाजांच अपयश ठळकपणे दिसून येते. शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, विराट कोहली, श्रेयस अय्यर हे सपशेल अपयशी ठरले. चेतेश्वर पुजाराने दुसऱ्याडावात अर्धशतक झळकवलं. पण संघाला गरज असताना तो बाद झाला. या उलट इंग्लंडच्या दुसऱ्याडावातील फलंदाजीवर नजर टाकल्यास लीस, क्रॉली, बेयरस्टो, रुट प्रत्येकाने योगदान दिलय. टॉप ऑर्डर आघाडीचे फलंदाज दोन्ही डावात फ्लॉप ठरले, तर सामना कसा जिंकणार? पहिल्या डावात ऋषभ पंत, रवींद्र जाडेजाने उभे राहिले नसते, कदाचित तीन दिवसातच ही कसोटी निकाली निघाली असती.
  2. जॉनी बेयरस्टो आणि ज्यो रुट सारखे फलंदाज खेळपट्टीवर असताना क्षेत्ररक्षकांकडून झालेली एक छोटीशी चूकही महाग पडू शकते. सध्या हे दोन्ही फलंदाज फॉर्म मध्ये आहेत. यांना बाद करणं आव्हानात्मक आहे. अशावेळी त्यांचा झेल सोडणं परवडणारं नाही. हनुमा विहारीकडून ही चूक झाली. मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर 14 धावांवर खेळणाऱ्या बेयरस्टोचा त्याने स्लीप मध्ये झेल सोडला. त्याच बेयरस्टोने नाबाद 114 धावा केल्या.
  3. दुसऱ्याडावात भारतीय गोलंदाजांना काय होतं? हा मोठा प्रश्न आहे. पहिल्या डावात समोरच्या संघाला ऑलआऊट करणारे हे गोलंदाज दुसऱ्याडावात मात्र निष्प्रभावी ठरत आहेत. दक्षिण आफ्रिका सीरीजमध्ये हे दिसून आलं होतं. आताही तेच दिसलं. पहिल्या डावात इंग्लंडला 284 धावांवर ऑलआऊट करुन 132 धावांची आघाडी मिळवून दिली. पण दुसऱ्याडावात जसप्रीत बुमराह वगळता एकाही गोलंदाजाला विकेट काढणं जमलं नाही. मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर यांनी दुसऱ्या इनिंग मध्ये स्वैर गोलंदाजी केली. अचूक टप्पा आणि दिशा त्यांना ठेवता आली नाही. चौथ्यादिवशी इंग्लिश गोलंदाजांनी रणनिती अंतर्गत शॉर्ट चेंडूंचा मारा केला. त्यात भारतीय फलंदाज फसले. पण भारतीय गोलंदाजांकडे दोन दिवसात अशी कुठली रणनिती दिसली नाही.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें