IND vs ENG 5 th Test Result: इंग्लंडने बाजी पलटवली, भारताचा दारुण पराभव

IND vs ENG 5 th Test Result: एजबॅस्टन कसोटी जिंकून इंग्लंडने मालिकेत 2-2 अशी बरोबर साधली आहे. जॉनी बेयरस्टो (Jonny Bairstow) आणि ज्यो रुट (Joe Root) इंग्लंडच्या विजयाचे शिल्पकार ठरले.

IND vs ENG 5 th Test Result: इंग्लंडने बाजी पलटवली, भारताचा दारुण पराभव
Root-Baristow
Image Credit source: ECB Twitter
दीनानाथ मधुकर परब, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Jul 05, 2022 | 5:24 PM

मुंबई: एजबॅस्टन कसोटी जिंकून इंग्लंडने मालिकेत 2-2 अशी बरोबर साधली आहे. जॉनी बेयरस्टो (114) (Jonny Bairstow) आणि ज्यो रुट (142) (Joe Root) इंग्लंडच्या विजयाचे शिल्पकार ठरले. त्यांनी चौथ्या विकेटसाठी नाबाद 269 धावांची भागीदारी केली  इंग्लंडने अत्यंत कठीण वाटणारा विजय सहज साध्य केला. भारताने विजयासाठी दिलेलं 378 धावांच लक्ष्य इंग्लंडने (IND vs ENG) तीन विकेट गमावून पार केलं. इंग्लंडला आज अखेरच्या दिवशी विजयासाठी 119 धावांची गरज होती. भारतीय गोलंदाज सकाळच्या सत्रात काहीतरी चमत्कार करतील, असं वाटलं होतं. पण चौथ्या दिवसाप्रमाणे आजही भारतीय गोलंदाजांनी मारच खाल्ला. रुट-बेयरस्टो जोडी समोर ते हतबल दिसले. मागच्यावर्षी कोविडमुळे पाचवी कसोटी रद्द झाली होती. तो सामना आता खेळवण्यात आला. भारताकडे मालिकेत 2-1 अशी आघाडी होती. भारताला तब्बल 15 वर्षातनंतर इंग्लंडमध्ये मालिका विजयाची संधी होती. पण भारताने ही संधी दवडली.

चौथ्यादिवशी खेळ पलटला

भारताने या कसोटी सामन्यात पहिले तीन दिवस वर्चस्व गाजवलं. पण चौथ्यादिवशी खेळ पलटला. इंग्लंडने जबरदस्त कमबॅक केलं. आधी इंग्लिश गोलंदाजांनी आपली भूमिका चोख बजावली. त्यानंतर फलंदाजांनी अशक्यप्राय वाटणार लक्ष्य गाठून दिलं.

दुसऱ्याडावात भारतीय गोलंदाजांना काय होतं?

पहिल्याडावातील भारतीय गोलंदाजांची कामगिरी पाहता, दुसऱ्याडावात ते भारताला सहज विजय मिळवून देतील असं वाटलं होतं. पण मागच्या काही कसोटी सामन्यांपासून सुरु असलेला प्रकार इथेही पहायला मिळाला. दुसऱ्याडावात भारतीय गोलंदाज निष्प्रभ ठरले. त्यांना इंग्लंडचे 10 विकेट काढणं शक्य झालं नाही. दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिकेत शेवटच्या दोन कसोटीत असच घडलं होतं. पहिल्या डावात भेदक वाटणारे भारतीय गोलंदाज दुसऱ्याडावात कमी पडतात. एजबॅस्टन कसोटीत हेच झालं.

इंग्लंडकडून पहिल्यांदा यशस्वी पाठलाग

सुरुवातीला 378 धावांच टार्गेट अवघड वाटलं होतं. पण इंग्लंडचे सलामीवीर लीस (56) आणि क्रॉलीने (46) दमदार सुरुवात करुन दिली. त्यानंतर रुट-बेयरस्टो जोडीने त्या पायावर कळस चढवला. त्यामुळे इंग्लंडसाठी विजय सोपा झाला. जसप्रीत बुमराह वगळता दुसऱ्याडावात एकाही भारतीय गोलंदाजाला विकेट काढणं जमलं नाही. इंग्लंडने पहिल्यांदाच 378 धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला.

इंग्लंडचा संघ का जिंकला?

गोलंदाजांइतकीच या कसोटीत फलंदाजांची सुद्धा चूक आहे. पहिल्या डावात फक्त ऋषभ पंत (146) आणि रवींद्र जाडेजा (104) यांच्या शतकी खेळीने भारताला सावरलं. दुसऱ्याडावात चेतेश्वर पुजारा (66) आणि पंत (57) यांनी आश्वासक फलंदाजी केली. अन्य आघाडीचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले. तेच दुसऱ्याबाजूला इंग्लंडच्या दुसऱ्याडावात टॉप ऑर्डरने जबाबदारी खांद्यावर घेऊन खेळ केला. प्रत्येकाने आपलं योगदान दिलं. त्यामुळे विजयाचा अध्याय लिहिता आला.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें