ENG vs IND : इंग्लंड विरुद्ध विजय म्हणजे वर्ल्ड कप फिक्स, टीम इंडिया पुन्हा चॅम्पियन होणार?

India vs England Semi Final T20i World Cup 2026 : क्रिकेटमध्ये जो चांगला खेळतो तो जिंकतो हे जगजाहीर आहे. मात्र योगायोग पाहिल्यास आणि टीम इंडियाने इंग्लंडला पराभूत केल्यास यंदाही टीम इंडिया वर्ल्ड चॅम्पियन ठरेल हे निश्चित आहे. जाणून घ्या

ENG vs IND : इंग्लंड विरुद्ध विजय म्हणजे वर्ल्ड कप फिक्स, टीम इंडिया पुन्हा चॅम्पियन होणार?
Indian Cricket Team National Anthem
Image Credit source: axar patel x account
| Updated on: Mar 05, 2026 | 5:45 PM

यजमान टीम इंडिया आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या उपांत्य फेरीसाठी सज्ज झाली आहे. टीम इंडिया सेमी फायनलमध्ये इंग्लंड विरुद्ध 2 हात करणार आहे. हा सामना गुरुवारी 5 मार्च रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे.सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे. न्यूझीलंडने बुधवारी दक्षिण आफ्रिकेला पराभूत करुन अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आता न्यूझीलंड विरुद्ध अंतिम फेरीत कोण पोहचणार? हे भारत विरुद्ध इंग्लंड या सामन्याच्या निकालानंतरच स्पष्ट होईल.

भारत विरुद्ध इंग्लंड सामन्याबाबत अनेक तर्कवितर्क लढवण्यात येत आहेत. तसेच या सामन्याच्या निमित्ताने एक योगायोग पाहायला मिळाला आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड या दोन्ही संघाची टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आमनेसामने येण्याची ही एकूण आणि सलग तिसरी वेळ ठरली आहे. दोन्ही संघांची टी 20i वर्ल्ड कप उपांत्य फेरीतील आकडेवारी ही 1-1 अशी आहे. तसेच टीम इंडियाने जेव्हा जेव्हा इंग्लंडला पराभूत केलंय तेव्हा भारताने वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरलंय हा इतिहास आहे. त्यामुळे यंदाही टीम इंडियाने इंग्लंडला पराभूत करुन वर्ल्ड कप विजयाचा दावा आणखी मजबूत करावा, अशीच आशा प्रत्येक भारतीय चाहत्याला आहे.

इंग्लंडने टीम इंडियाला 2022 च्या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील उपांत्य फेरीत भारताचा पराभव केला होता. इंग्लंडने भारतावर 10 विकेट्सने विजय मिळवला होता. तर टीम इंडियाने रोहित शर्मा याच्या नेतृत्वात 2024 च्या सेमी फायनलमध्ये इंग्लंडला पराभूत करत 2022 चा हिशोब चुकता केला होता. तसेच त्यानंतर अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेवर मात करत 2007 नंतर पहिल्यांदाच टी 20i वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केली होती.

1983 साली काय झालेलं?

कपिल देव यांनी 1983 साली टीम इंडियाला त्यांच्या कॅप्टन्सीत पहिलावहिला वर्ल्ड कप जिंकून दिला होता. तेव्हाही भारताने इंग्लंडला उपांत्य फेरीत पराभूत केलं होतं. टीम इंडियाने तेव्हा इंग्लंडवर 6 विकेट्सने विजय मिळवला होता. तर विंडीजवर मात करुन वर्ल्ड कपवर नाव कोरलं होतं.

1987 साली वनडे वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये पराभव

तत्कालिन गतविजेत्या टीम इंडियाला 1987 साली वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील उपांत्य फेरीत इंग्लंडने पराभवाची धुळ चारली होती. त्यामुळे इतिहास पाहता जेव्हा जेव्हा टीम इंडियाने इंग्लंडला धोबीपछाड दिलाय तेव्हा भारताने वर्ल्ड कप जिंकलाय. अशात आता यंदा काय होतं? हे उभयसंघातील सामन्याच्या निकालानंतरच स्पष्ट होईल.

Follow Us