
शुबमन गिल याच्या नेतृत्वात टीम इंडियाने 2026 वर्षातील पहिल्याच आणि एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात विजयी सलामी दिली. भारताने यासह न्यूझीलंड विरूद्धच्या 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी मिळवली. मात्र त्यानंतर न्यूझीलंडने जोरदार कमबॅक केलं. न्यूझीलंडने सलग 2 सामने जिंकून भारताला लोळवलं. न्यूझीलंडने भारताला राजकोटमध्ये पराभूत करत मालिकेत बरोबरी साधली. न्यूझीलंडने त्यानंतर रविवारी 18 जानेवारीला भारतावर मात केली. न्यूझीलंडने भारतासमोर इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये अंतिम सामन्यात 338 धावांचं आव्हान ठेवलं होतं. भारताने विराट कोहली याच्या शतकाच्या जोरावर जोरदार झुंज दिली. तसेच नितीश कुमार रेड्डी आणि हर्षित राणा या युवा जोडीने अर्धशतक झळकावत विराटला चांगली साथ दिली. मात्र भारताला 296 धावांपर्यंतच मजल मारता आली.
न्यूझीलंडने अशाप्रकारे 41 धावांनी सामना जिंकला. न्यूझीलंडने सोबतच भारतात टीम इंडिया विरुद्ध पहिल्यांदाच वनडे सीरिज जिंकण्याची कामगिरी केली. न्यूझीलंडने ही मालिका 2-1 ने आपल्या नावावर केली आणि इतिहास घडवला.
विराट आणि रोहित शर्मा या दोघांचा हा या मालिकेतील शेवटचा सामना होता. विराट आणि रोहित कसोटी आणि टी 20i मालिकेतून निवृत्त झाले आहेत. त्यामुळे दोघेही फक्त एकदिवसीय क्रिकेटमध्येच खेळतात. त्यामुळे आता भारताची ही अनुभवी जोडी पुन्हा केव्हा अॅक्शन मोडमध्ये दिसणार? याची प्रतिक्षा चाहत्यांना आहे. या निमित्ताने आता टीम इंडिया पुढील वनडे सीरिज केव्हा खेळणार? हे जाणून घेऊयात.
भारतीय चाहत्यांना टीम इंडियाच्या पुढील वनडे सीरिजसाठी 1-2 नाही तर तब्बल 6 महिने प्रतिक्षा करावी लागणार आहे. टीम इंडिया आता थेट जुलै महिन्यात वनडे सीरिज खेळणार आहे. टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध वनडे सीरिजमध्ये भिडणार आहे. शुबमनसेना या मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे.
टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्याची सुरुवात ही 5 सामन्यांच्या टी 20i मालिकेने होणार आहे. त्यानंतर 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेचा थरार रंगणार आहे. रोहित आणि विराट या दोघांनी तोपर्यंत निवृत्ती न घेतल्यास आणि त्यांना दुखापत नसल्यास ते या मालिकेत खेळणार असल्याचं निश्चित आहे.
भारत विरुद्ध इंग्लंड, पहिला सामना, 14 जुलै, बर्मिंघम
भारत विरुद्ध इंग्लंड, दुसरा सामना, 16 जुलै, कार्डीफ
भारत विरुद्ध इंग्लंड, तिसरा सामना, 19 जुलै, लॉर्ड्स
दरम्यान रोहित आणि विराटला टीम इंडियाच्या जर्सीत पाहण्यासाठी आता 6 महिने प्रतिक्षा करावी लागणार आहे. मात्र हे दोघे आयपीएल स्पर्धेतून मैदानात कमबॅक करणार आहेत. आयपीएलच्या 19 व्या मोसमाला मार्च महिन्यातील शेवटच्या आठवड्यापासून सुरुवात होणार असल्याचं निश्चित समजलं जात आहे. अशात रोहित मुंबई तर विराट आरसीबीकडून खेळताना दिसणार आहेत.