IND vs IRE: टीम इंडियावर मालिका 2-0 ने गमवण्याची वेळ, 8 षटकांचा खेळ झाला आणि पावसाची हजेरी
भारत आणि आयर्लंड यांच्यात दुसरा टी20 सामना सुरू आहे. पहिला सामना गमावल्यानंतर दुसऱ्या सामन्यात काहीही करून विजय मिळवणं भाग आहे. असं असताना 8 सामन्यांचा खेळ झाला आणि पावसाने हजेरी लावली. त्यामुळे मालिका गमवण्याची वेळ आली आहे.

भारत आणि आयर्लंड यांच्यात दोन सामन्यांची टी20 मालिका सुरू आहे. या मालिकेत पहिल्या सामन्यात भारताने पराभवाचं तोंड पाहिलं होतं. त्यामुळे मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी दुसरा सामना काहीही करून जिंकणं भाग आहे. असं असताना भारतावर दुसऱ्या सामन्यात पराभवाची नामुष्की ओढावली आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. आयर्लंडने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 गडी गमवून 154 धावा केल्या. तसेच विजयासाठी 155 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गाठताना भारतीय संघाची त्रेधातिरपीट उडाली. सलामीच्या फलंदाजांना खातंही उघडता आलं नाही. विजयी धावांचा पाठलाग करताना 8 षटकात भारताने 4 गडी गमवून 54 धावा केल्या. पण पावसाने हजेरी लावल्याने खेळ थांबला. हा खेळ पुन्हा सुरू झाला नाही तर भारताला पराभवाचं तोंड पाहावं लागणार आहे. म्हणजेच भारतावर आयर्लंडविरुद्धची मालिका 2-0 ने गमवण्याची नामुष्की ओढावणार आहे.
भारतीय संघ 154 या विजयी धावांचा पाठलाग करताना 8 षटकात 4 गडी गमवून 54 धावांवर आहे. त्यामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार भारतीय संघ अजूनही 15 धावांनी पिछाडीवर आहे. हा सामना सुरू झाला नाही तर आयर्लंडला विजयी घोषित केलं जाईल. कारण डकवर्थ लुईस नियम 5 षटकांचा खेळ झाला की लागू होतं. भारतीय संघ 8 षटकं खेळला आहे. त्यामुळे भारतावर मालिका 2-0 ने गमवण्याची वेळ आहे. क्रिकेटच्या इतिहासात भारतीय संघाला आयर्लंडकडून व्हाईट वॉश मिळण्याची शक्यता वाढली आहे. पाऊस थांबल्यानंतर पुन्हा खेळ सुरू झाला तर धावांचं अंतर झटपट कमी करण्याचं आव्हान असणार आहे. कारण या सामन्यात पुन्हा पावसाची शक्यता आहे. त्यामुळे भारतीय संघावर दबाव वाढला आहे.
दरम्यान, या सामन्यात भारतीय संघाची निराशाजनक कामगिरी राहिली. सलामीच्या दोन्ही फलंदाजांना आपलं खातंही खोलता आलं नाही. संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा शून्यावर बाद झाले. दोघंही गोल्डन डकवर बाद झाले हे विशेष.. तर इशान किशन 12 धावांवर असताना धावचीत झाला. तर कर्णधार श्रेयस अय्यरचा खेळही 10 धावांवर आटोपला. पाऊस थांबल्यानंतर पुन्हा एकदा खेळ सुरू झाला आहे. पण भारतीय संघाला आता डकवर्थ लुईस नियम पाहून धावांचं अंतर कमी करावं लागणार आहे.