IND vs NAM : नामिबिया विरूद्ध प्लेइंग ईलेव्हनमध्ये 3 बदल फिक्स! कुणाला मिळणार संधी?
India Playing 11 vs Namibia Icc T20i World Cup 2026 : टीम इंडिया यूएसएनंतर आता नामिबियाला पराभूत करून सलग दुसरा सामना जिंकण्यासाठी सज्ज झाली आहे. मात्र टीम इंडिया नामिबिया विरुद्ध काही बदलांसह उतरणार असल्याचं निश्चित समजलं जात आहे. जाणून घ्या टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन.

भारतीय संघाने यूएसएला पराभूत करत आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 मोहमेची सुरुवात विजयाने केली. भारताने यूएसएला 7 फेब्रुवारी रोजी वानखेडे स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात 29 धावांनी लोळवलं. त्यानंतर आता यजमान भारताचा दुसरा सामनाही असोशिएट टीम विरुद्धच होणार आहे. भारतासमोर या सामन्यात नामिबियाचं आव्हान असणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नामिबिया विरूद्धच्या सामन्याला 2 खेळाडूंना मुकावं लागण्याची शक्यता आहे. ते 2 खेळाडू कोण आहेत? तसेच त्यांच्या जागी कोणत्या दोघांना संधी मिळू शकते? हे जाणून घेऊयात.
2 बदल फिक्स, कोण इन-कोण आऊट?
टीम इंडिया नामिबिया विरुद्ध किमान 2 बदलांसह उतरणार हे निश्चित आहे. ओपनर अभिषेक शर्मा आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज या दोघांना बाहेर व्हावं लागणार आहे. अभिषक शर्मा अजूनही पूर्णपणे फिट नाही. अभिषेकला आजारामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अभिषेकला आवश्यक उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला. मात्र अभिषेकला कमबॅकसाठी आणखी काही दिवस लागतील. अभिषेक पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यापर्यंत फिट होणं अपेक्षित आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना हा 15 फेब्रुवारीला होणार आहे.
तर दुसऱ्या बाजूला जसप्रीत बुमराह याच्या कमबॅकमुळे मोहम्मद सिराज याल बाहेर व्हावं लागणार आहे. बुमराह यूएसए विरूद्धच्या सामन्यासाठी उपलब्ध नव्हता. त्यामुळे मोहम्मद सिराज याचा प्लेइंग ईलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला होता. सिराजला दुखापतग्रस्त हर्षित राणा याच्या जागी 15 सदस्यीय संघात स्थान देण्यात आलं आहे.
अभिषेकमुळे संजू सॅमसनला संधी!
अभिषेक शर्मा याला नामिबिया विरूद्धच्या सामन्यात खेळता येणार नसल्याने त्याच्या जागी प्लेइ्ंग ईलेव्हनमध्ये संजू सॅमसन संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे टीम इंडियाची ओपनिंग जोडी बदलणार हे निश्चित आहे. त्यामुळे चाहत्यांना नामिबिया विरुद्ध संजू सॅमसन आणि इशान किशन हे दोघे ओपनिंग करताना दिसणार आहेत.
सुंदरमुळे रिंकूला डच्चू?
ऑलराउंडर वॉशिंग्टन सुंदर दुखापतीवर मात करत संघासह जोडला गेला आहे. मात्र सुंदर नामिबिया विरुद्ध खेळणार की नाही? हे स्पष्ट नाही. सुंदर फिट असल्यास त्याला पाकिस्तान विरूद्धच्या सामन्याआधी खेळवण्याचा मानस टीम मॅनेजमेंटचा असू शकतो. त्यामुळे सुंदरसाठी रिंकु सिंग याला त्याग करावा लागू शकतो.
टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन : संजू सॅमसन, ईशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, वॉशिंगटन सुंदर/ रिंकू सिंह, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह आणि वरुण चक्रवर्ती.