
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेपूर्वी भारत आणि न्यूझीलंडची चाचणी परीक्षा सुरू झाली आहे. पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना नागपूरमध्ये होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा न्यूझीलंडच्या बाजूने लागला आणि भारताच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. दुसर्या डावातील दव फॅक्टर पाहता मोठ्या धावसंख्येची अपेक्षा होती. भारताने केलंही तसंच.. भारताचा सलामीचा फलंदाज अभिषेक शर्माने 35 चेंडूत 84 धावांची खेळी केली. तर रिंकु सिंहने फिनिशिंग टच दिला. त्यामुळे भारताने 20 षटकात 7 गडी 238 धावा केल्या. तसेच विजयासाठी 239 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गाठताना न्यूझीलंडची निराशाजनक सुरुवात झाली. कारण न्यूझीलंडला पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर धक्का बसला. संघाच्या खात्यात काहीच नसताना विकेट पडल्याने न्यूझीलंड बॅकफूटवर गेली.
भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने पहिलं षटक अर्शदीप सिंगच्या हाती सोपवलं. खरं तर अर्शदीप हा टी20 क्रिकेटमधील विकेट टेकिंग गोलंदाज म्हणून ओळखला जातो. पहिल्या षटकात विकेट घेण्याची त्याची खासियत आहे. त्याच्याकडून तशीच अपेक्षा होती. त्याला साथ दिली ती विकेटकीपर संजू सॅमसनने .. स्ट्राईकला डेवॉन कॉनवे होता. त्याने अर्शदीपचा पहिला चेंडू निर्धाव सोडला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर फटका मारताना चाचपडला. त्याच्या बॅटला कट लागली आणि विकेटकीपर संजू सॅमसनच्या हाती गेला. पण हा चेंडू खूपच खाली होती. संजू सॅमसनने झेल पकडताना जराही चूक केली नाही. त्याने डाव्या बाजूला उडी घेत अप्रतिम झेल पकडला.
A STUNNING CATCH BY SANJU SAMSON. 🇮🇳🔥 pic.twitter.com/Uy5zlTnIS1
— Johns. (@CricCrazyJohns) January 21, 2026
न्यूझीलंडला डेवॉन कॉनव्हेच्या रूपाने पहिला धक्का बसला. त्याला खातंही खोलता आलं नाही. संजू सॅमसनने घेतलेला झेल पाहून सूर्यकुमार यादवही खूश झाला. कारण पहिल्या स्लीपला तोच उभा होता. त्याने हा झेल अगदी जवळून पाहीला. अर्शदीप सिंग आणि डेवॉन कॉनव्हे यांचा सहा वेळा आमनासामना झाला आहे. यात डेवॉन कॉनव्हे अर्शदीपचे 25 चेंडू खेळला आहे. तसेच त्याने 42 धावा केल्या आहे. पण अर्शदीपने त्याला चार वेळा तंबूचा रस्ता दाखवला आहे.