
इशान किशन याने केलेलं शतक आणि त्यानंतर अर्शदीप सिंह याने घेतलेल्या 5 विकेट्सच्या जोरावर टीम इंडियाने न्यूझीलंडचा पाचव्या आणि अंतिम टी 20I सामन्यात 46 धावांनी धुव्वा उडवला आहे. टीम इंडियाने न्यूझीलंडसमोर 272 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र न्यूझीलंडला 19.4 ओव्हरमध्ये ऑलआऊट 225 धावाच करता आल्या. भारताने अशाप्रकारे अंतिम सामन्यात विजय मिळवला. तसेच भारताने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात ही मालिका 4-1 अशा एकतर्फी फरकाने आपल्या नावावर केली. टीम इंडियाचा हा तिरुवनंतरपुरम येथील ग्रीन फिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियममधील चौथा टी 20i विजय ठरला.
सूर्यकुमार यादव याने नाणेफेक जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. हा निर्णय अगदी योग्य ठरला. इशान किशन याने सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. इशानने शतक ठोकलं. तर कॅप्टन सूर्याने अर्धशतकी खेळी केली. अखेरच्या क्षणी हार्दिक पंड्या याने फटकेबाजी करत निर्णायक धावा जोडल्या. शिवम दुबे 7 आणि रिंकु सिंह 8 धावांवर नाबाद परतले. संजू सॅमसन पुन्हा अपयशी ठरला. संजू 6 धावा करुन माघारी परतला. तर ओपनर अभिषेक शर्मा याने 30 धावांचं योगदान दिलं.
भारताची सलामी जोडी माघारी परतल्यानंतर इशान किशन आणि सूर्यकुमार यादव या जोडीने कमाल केली. इशानने 103 धावा केल्या. तर सूर्याने 63 धावांची खेळी केली. तर हार्दिक पंड्या याने 42 धावा करत फिनिशिंग टच दिला. न्यूझीलंडसाठी लॉकी फर्ग्यूसन याने 2 विकेट्स मिळवल्या. तर इतर तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.
अर्शदीप सिंह याने विक्रमी धावांचा पाठलाग करायला आलेल्या न्यूझीलंडला पहिल्याच ओव्हरमध्ये झटका दिला. अर्शदीपने टीम सेफर्टला 5 रन्सवर आऊट केलं. त्यानंतर फिन एलन याने रचीन रवींद्रसोबत भारतीय गोलंदांजांची धुलाई केली. या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी 48 बॉलमध्ये 100 रन्सची पार्टनरशीप केली. या भागीदारीमुळे सामन्यात रंगत आली होती. फिन एलेन चौफेर फटकेबाजी करत होता. त्यामुळे फिनला रोखण्याचं भारतीय गोलंदाजांसमोर आव्हान होतं. ही कामगिरी उपकर्णधार अक्षर पटेल याने करुन दाखवली.
अक्षरने फिनला आऊट करत भारताची मोठी डोकेदुखी दूर केली. फिनने 38 बॉलमध्ये 6 सिक्स आणि 8 फोरसह 80 रन्स केल्या. त्यानंतर भारताने जोरदार कमबॅक केलं. भारताने न्यूझीलंडला ठराविक अंतराने आणि झटपट झटके दिले. त्यामुळे न्यूझीलंडच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. न्यूझीलंडसाठी इश सोढी 33, रचीन रवींद्र 30 आणि डॅरेल मिचेल याने 26 धावा केल्या. न्यूझीलंडच्या या व्यतिरिक्त एकाही फलंदाजाला भारताच्या गोलंदाजांसमोर दुहेरी आकडा गाठता आला नाही.
न्यूझीलंडला गुंडाळण्यात अर्शदीपने प्रमुख भूमिका बजावली. अर्शदीपने 4 ओव्हरमध्ये 51 रन्सच्या मोबदल्यात 5 विकेट्स मिळवल्या. अक्षरने तिघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर वरुण चक्रवर्ती आणि रिंकु सिंह या दोघांनी 1-1 विकेट मिळवत इतरांना चांगली साथ दिली.