
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड दोन्ही संघ 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी सज्ज झाले आहेत. उभयसंघातील मालिकेचा थरार 11 जानेवारीपासून रंगणार आहे. दोन्ही संघांची ही नववर्षातील पहिलीवहिली आंतरराष्ट्रीय मालिका आहे. पहिला सामना हा बडोदा इथे आयोजित करण्यात आला आहे. यासह तब्बल 15 वर्षांनंतर बडोदाला आंतरराष्ट्रीय सामन्याचं यजमानपद मिळालं आहे. नवीन स्टेडियममधील हा पहिलावहिला सामना असणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांमुळे हा सामना आणखी खास होणार आहे. हा क्षण कायम लक्षात रहावा अर्थात अविस्मरणीय व्हावा यासाठी बडोदा क्रिकेट असोसिएशनकडून खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे.
उभयसंघातील पहिला सामना हा कोतंबी स्टेडियममध्ये होणार आहे. त्यामुळे या सामन्याला बीसीसीआय अध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित असतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे रविवार 11 जानेवारी बीसीएसाठी फार मोठा दिवस असणार आहे. तसेच बीसीए या सामन्याआधी रोहित आणि विराट या अनुभवी जोडीचा खास सन्मान करण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सामन्याआधी रोहित आणि विराटसाठी बीसीएकडून एका छोट्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे.
रेव्हस्पोर्ट्सनुसार, सामन्याआधी फ्लॅग ऑफ इव्हेंटचं आयोजन करण्यात येणार आहे. फ्लॅग ऑफ करण्याचा बहुमान बीसीसीआय अध्यक्ष, पदाधिकारी किंवा कर्णधार शुबमन गिल यांना मिळणार नाही. तर बीसीए हा बहुमान रोहित आणि विराटला देणार आहे. त्यासाठी परवानगी मिळाली आहे.
रिपोर्टनुसार, आता आम्हाला फ्लॅग ऑफसाठी फक्त रोहित आणि विराटच्या होकाराची प्रतिक्षा आहे. दोघांनी होकार दिला तर त्यांच्या हस्ते झेंडा फडकवल्यानंतरच सामन्याला सुरुवात होईल, असं बीसीए सीएओ स्नेह पारिख म्हणाले.
दरम्यान रोहित शर्मा आणि विराट कोहली भारताची ही जोडी त्यांच्या कारकीर्दीच्या शेवटच्या टप्प्यात आहेत. तसेच दोघेही टी 20i आणि कसोटीतील निवृत्तीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फक्त एकदिवसीय प्रकारातच सक्रीय आहेत. त्यामुळे या दोघांच्या सामन्यांना तोबा गर्दी असते. बडोद्यातील या दोघांचा अखेरचा सामना असल्याचं समजलं जात आहे. या मैदानात पुन्हा सामना होईल तेव्हा हे दोघे संघात असतील की नाही? याबाबत शाश्वती नाही. त्यामुळे बीसीए या दोघांना सन्मानित करण्यासाठी उत्सूक आहेत.