
पहिल्या 3 फलंदाजांनी केलेली वादळी खेळी आणि अखेरच्या क्षणी ऑलराउंडरने दिलेल्या फिनिशिंग टचच्या जोरावर टीम इंडियाने आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत इतिहास घडवला आहे. टीम इंडियाने आयसीसी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत सर्वोच्च धावसंख्या साकारत वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. संजू सॅमसन, अभिषेक शर्मा आणि इशान किशन या टीम इंडियाच्या टॉपच्या 3 एक्क्यांनी कमाल करत अर्धशतक झळकावलं. तर अखेरच्या क्षणी शिवम दुबे याने फिनिशिंग टच दिला. भारताने या जोरावर 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 255 धावा केल्या.
टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोच्च 260 धावांचा विक्रम हा श्रीलंकेच्या नावावर आहे. मात्र श्रीलंकेने ही कामगिरी साखळी फेरीत केली होती. तर टीम इंडियाने फायनलमध्ये 255 धावा करण्याचा कारनामा केला आहे. श्रीलंकेने 2007 साली केनिया विरुद्ध 6 विकेट्स गमावून 260 धावा केल्या होत्या.
सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा या दोघांचा अपवाद वगळता भारताच्या 5 फलंदाजांनी फटकेबाजी केली. या 5 फलंदाजांनी या डावात एकूण 18 सिक्स आणि 19 फोर लगावले.
संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा या सलामी जोडीने भारताला जबरदस्त सुरुवात करुन दिली. अभिषेकन आणि संजू या दोघांनी फटकेबाजी करत पावरप्ले आपल्या नावावर केला. अभिषेकने या दरम्यान अवघ्या 18 चेंडूत अर्धशतक झळकावलं. अभिषेक यासह टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वात वेगवान अर्धशतक करणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरला. मात्र अभिषेक अर्धशतकानंतर आऊट झाला. अभिषेक आऊट झाल्याने भारताची सेट जोडी फुटली. अभिषेक आणि संजूने 7.1 ओव्हरमध्ये 98 रन्स केल्या. अभिषेकने 3 सिक्स आणि 6 फोरसह 21 बॉलमध्ये 52 रन्स केल्या.
त्यानंतर संजूने इशान किशन याच्यासह दुसर्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. संजूने या दरम्यान अर्धशतकांची हॅट्रिक केली. तर इशाननेही चांगल्या सुरुवातीचा फायदा घेत न्यूझीलंडच्या गोलंदाजांची धुलाई केली. दोघांनी प्रत्येक बॉल मारत न्यूझीलंड वर कुरघोडी केली. संजू पाहता पाहता अर्धशतकानंतर शतकाजवळ पोहचला. मात्र संजू पुन्हा शतक झळकावण्यात अपयशी ठरला. संजू सलग दुसऱ्यांदा 89 धावांवर आऊट झाला. संजूने 46 बॉलमध्ये 8 सिक्स आणि 5 फोरसह 89 रन्स केल्या.
जेम्स निशाम याने संजूला आऊट करत दुसऱ्या विकेटसाठी झालेली 105 धावांची भागीदारी मोडीत काढली. जेम्सने 16 व्या ओव्हरमधील पहिल्या बॉलवर संजूला आऊट केलं. जेम्सन याच ओव्हरमध्ये संजूनंतर सेट इशान किशन याला आऊट केलं. तर कॅप्टन सूर्यकुमार यादव याला निशामने झिरोवर आऊट केलं. जेम्सने यासह एका ओव्हरमध्ये 3 विकेट घेत काही वेळ टीम इंडियाच्या धावांना ब्रेक लावला. त्यामुळे टीम इंडियाची स्थिती 16 ओव्हरमध्ये 203-1 वरुन 204-4 अशी झाली. त्यानंतर हार्दिकने 13 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 1 फोरसह 18 धावांचं योगदान देऊन मैदानाबाहेरचा रस्ता धरला.
त्यानंतर ऑलराउंडर शिवम दुबे याने तिलक वर्मा याच्यासोबत फिनिशिंग टच देत भारताला 250 पार पोहचवण्यात निर्णयाक भूमिका बजावली. शिवमने एकूण नाबाद 28 धावा केल्या. शिवमने त्यापैकी 24 धावा या शेवटच्या अर्थात 20 व्या ओव्हरमध्ये केल्या. शिवम आणि तिलकने 10 बॉलमध्ये 29 रन्सची नॉट आऊट पार्टनरशीप केली. शिवमने 8 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 3 फोरसह नॉट आऊट 26 रन्स केल्या. तर तिलक वर्मा 6 बॉलमध्ये 8 रन्स करुन नॉट आऊट परतला.