
टीम इंडियाने शुबमन गिल याच्या नेतृत्वात 2026 मधील पहिली आणि एकदिवसीय मालिका गमावली. उभयसंघातील 3 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत होती. मालिकेतील तिसऱ्या सामन्याचं आयोजन हे रविवारी 18 जानेवारीला इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं. मात्र भारताला या सामन्यात पराभूत व्हावं लागलं. भारताने या सलग दुसऱ्या पराभवासह मालिका गमावली. भारताला न्यूझीलंडने विजयासाठी दिलेल्या 338 धावांचा पाठलाग करताना 296 धावांपर्यंतच मारता आली. भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याने या सामन्यात शतक झळकावलं. विराटने भारतासाठी झुंजार खेळी करुन विजयी करण्याचा प्रयत्न केला. मात्र विराटला दुसऱ्या बाजूने अपवाद वगळता साथ मिळाली नाही. त्यामुळे भारताला पराभवाचा सामना करावा लागला. तसेच विराटचं शतक व्यर्थ गेलं.
विराटने या सामन्यात 108 बॉलमध्ये 124 रन्स केल्या. विराटने या खेळीत 10 चौकार आणि 3 षटकार लगावले. विराटचं हे या वर्षातील पहिलवहिलं आंतरराष्ट्रीय शतक ठरलं. तसेच विराटने या 3 सामन्यांच्या मालिकेत 80 च्या सरासरीने 240 धावा केल्या. विराटने या मालिकेत एकूण 6 विक्रम केले. त्याबाबत आपण जाणून घेऊया.
विराटने या मालिकेदरम्यान वेगवान 28 हजार आंतरराष्ट्रीय धावा करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड केला. विराटने यासह कुमार संगकारा आणि सचिन तेंडुलकर या दोघांना मागे टाकलं. विराटने 624 डावांत 28 हजार धावा केल्या. तर सचिनने 644 तर संगाकारा याने 666 डावांत 28 हजार धावा पूर्ण केल्या होत्या.
विराट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा एकूण दुसरा आणि पहिला सक्रिया फलंदाज ठरला आहे. सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावांचा वर्ल्ड रेकॉर्ड हा सचिन तेंडुलकर याच्या नावावर आहे. विराटने या मालिकेत कुमार संगकारा याला मागे टाकत सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज हा बहुमान मिळवला. विराटने 626 डावांत एकूण 28 हजार 215 धावा केल्या आहेत. तर संगकाराच्या नावावर 28 हजार 16 धावा आहेत. तर सचिनच्या नावावर सर्वाधिक 34 हजार 357 धावा आहेत.
विराटने इंदूरमधील सामन्यात शतक झळकावताच मोठा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला. विराट वीरेंद्र सेहवाग आणि रिकी पाँटिंग या दोघांना मागे टाकत न्यूझीलंड विरुद्ध सर्वाधिक 7 एकदिवसीय शतकं लगावणारा फलंदाज ठरला.
विराटने रिकी पाँटिंग याचा वनडेत तिसऱ्या स्थानी खेळताना सर्वाधिक धावांचा विक्रम मोडीत काढला आहे. विराटने तिसऱ्या स्थानी खेळताना 299 डावांत 12 हजार 676 धावा केल्यात. तर पाँटिंगने 12 हजार 662 धावा केल्या होत्या.
विराट कोहली न्यूझीलंड विरुद्ध वनडेसह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (कसोटी, वनडे आणि टी 20I) सर्वाधिक 10 शतकं लगावणारा पहिला फलंदाज ठरला आहे.
विराटच्या नावावर सलग 5 डावांत 50 पेक्षा अधिक धावांचा विक्रम आहे. विराटने न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या वनडेत 93 धावा करत हा कारनामा केला होता. विशेष म्हणजे विराटची सलग 5 वेळा 50 पेक्षा अधिक धावा करण्याची ही पाचवी वेळ ठरली.