
दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी दुसऱ्या टी 20I सामन्यात भारतीय गोलंदाजांची जोरदार धुलाई केली आहे. दक्षिण आफ्रिकेने विस्फोटक बॅटिंगच्या जोरावर 200 पार मजल मारली आहे. दक्षिण आफ्रिका यासह भारताविरुद्ध टी 20I वर्ल्ड कप 2024 नंतर 200 पेक्षा अधिक धावा करणारीा पहिली टीम ठरली आहे. दक्षिण आफ्रिकेने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 213 रन्स केल्या. दक्षिण आफ्रिकेला 200 पार पोहचवण्यात ओपनर क्विंटन डी कॉक याने सर्वाधिक योगदान दिलं. तर कॅप्टन एडन मार्रक्रम, डेव्हिड मिलर आणि डोनोवन फरेरा या तिघांनीही निर्णायक योगदान दिलं. त्यामुळे आता टीम इंडियाला सलग दुसरा विजय मिळवायचा असेल तर 214 धावा कराव्या लागणार आहेत. टीम इंडिया या 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे.
टीम इंडियाने टॉस जिंकून दक्षिण आफ्रिकेला बॅटिंगसाठी भाग पाडलं. रिझा हेंड्रीक्स आणि क्विंटन डी कॉक या सलामी जोडीने संधीचा फायदा घेतला. या जोडीने आश्वासक सुरुवात केली. दोघांनी 38 रन्सची पार्टनरशीप केली. वरुण चक्रवर्ती याने रिझाला 8 रन्सवर बोल्ड केलं.
त्यानंतर डी कॉक याने कॅप्टन एडन मार्रक्रम याच्यासह दुसऱ्या विकेटसाठी विस्फोटक पार्टनरशीप केली. या दोघांनी दुसर्या विकेटसाठी 47 बॉलमध्ये 83 रन्सची पार्टनरशीप केली. या दरम्यान दोघांनीही फटकेबाजी केली. त्यामुळे ही जोडी भारतासाठी डोकेदुखी ठरत होती. मात्र पुन्हा वरुण चक्रवर्ती याने एडनला अक्षर पटेल याच्या हाती कॅच आऊट करत मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. एडनने 29 रन्स केल्या.
त्यानंतर क्विंटनने डेवाल्ड ब्रेव्हीस यासह तिसर्या विकेटसाठी 19 बॉलमध्ये 35 रन्सची पार्टनरशीप केली. विकेटकीपर जितेश शर्मा याने हुशारीने क्विंटन डी कॉक याला रन आऊट केलं.अशाप्रकारे डी कॉकच्या खेळीचा शेवट झाला. डी कॉकने 46 बॉलमध्ये 7 सिक्स आणि 5 फोरसह 90 रन्स केल्या.
त्यानंतर बरोबर दुसऱ्या ओव्हरमध्ये टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला चौथा झटका दिला. तिलक वर्मा याने अक्षर पटेल याच्या बॉलिंगवर अप्रतिम कॅच घेतला. तिलकने डेवाल्डचा 14 रन्सवर अप्रतिम कॅच घेत त्याला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. त्यानंतर डोनोवन फरेरा आणि डेव्हिड मिलर या जोडीने फटकेबाजी केली. फरेरा आणि मिलरने पाचव्या विकेटसाठी 23 बॉलमध्ये नॉट आऊट 53 रन्सची पार्टनरशीप केली. फरेरा याने 16 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 1 फोरसह नॉट आऊट 30 रन्स केल्या. तर मिलरने 12 चेंडूत 20 धावा केल्या.
दरम्यान टीम इंडियाने आतापर्यंत टी 20i क्रिकेटच्या इतिहासात 209 धावांचा यशस्वी पाठलाग केला आहे. मात्र आता टीम इंडियाला जिंकायचं असेल तर विक्रमी धावांचा पाठलाग करावा लागणार आहे. त्यामुळे आता वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडिया ही कामगिरी करणार की नाही? यासाठी निकालापर्यंत प्रतिक्षा करावी लागणार आहे.