
टीम इंडिया केएल राहुल याच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील हा सामना शनिवारी 6 डिसेंबरला विशाखापट्टणममध्ये आयोजित करण्यात आला आहे. ही 3 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. दक्षिण आफ्रिका या मालिकेत 0-1 ने पिछाडीवर होती. भारताने रांचीत विजयी सुरुवात करत मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली होती. मात्र दक्षिण आफ्रिकेने भारताचा रायपूरमध्ये हिशोब केला आणि मालिका बरोबरीत आणली. आता अंतिम सामन्यासह मालिका कोण जिंकणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. तसेच भारतीय चाहत्यांचं विराट कोहली याच्या कामगिरीकडे विशेष लक्ष असणार आहे.
विराट कोहली याने या मालिकेतील पहिल्या 2 सामन्यात धमाका केला. विराटने सलग दोन्ही सामन्यात शतक झळकावलं. विराट यासह या मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. विराटने 2 सामन्यांमध्ये 118.50 च्या सरासरीने 237 धावा केल्या आहेत. विराटने या सलग 2 शतकांसह रायपूरमध्ये अनेक विक्रम आपल्या नावावर केले. त्यानंतर आता विराटला अंतिम सामन्यात 3 विक्रम आपल्या नावावर करण्याची संधी आहे.
आतापर्यंत एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात एकूण 12 फलंदाजांनी सलग 3 शतकं झळकावली आहेत. या 12 फलंदाजांमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचाही समावेश आहे. तर पाकिस्तानचा अनुभवी फलंदाज बाबर आझम याने 2 वेळा सलग 3 शतकं करण्याची लगावण्याची कामगिरी केली आहे. त्यामुळे विराटकडे सलग दुसऱ्यांदा 3 शतकं लगावून बाबर आझम याच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी करण्याची संधी आहे.
विराटने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध या मालिकेतील पहिल्या 2 सामन्यात अनुक्रमे 135 आणि 102 अशा धावा केल्या. विराट त्याआधी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेत खेळला होता. विराटने तेव्हाही दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक केलं होतं. त्यामुळे विराटकडे विशाखापट्टणममध्ये शतक करुन दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चौकार लगावण्यात संधी आहे. विराटने असं केल्यास तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलग 4 शतकं झळकावणारा पहिला फलंदाज ठरेल.
विराट सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. विराटला दुसऱ्या स्थानी असलेल्या कुमार संगकारा याला पछाडण्यासाठी फक्त 107 धावांची गरज आहे.