
विशाखापट्टणममध्ये टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्याचं आयोजन करण्यात आलं आहे. ही मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे तिसरा सामना हा अतिशय निर्णायक असा आहे. या तिसऱ्या सामन्याला दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 1 वाजता टॉस झाला. अखेर सलग 20 सामन्यांनंतर टीम इंडियाच्या बाजूने एकदिवसीय क्रिकेटमध्ये नाणेफेकीचा कौल लागला आहे. कर्णधार केएल राहुल याने फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे.
टीम इंडियाने अंतिम सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये 1 बदल केला आहे. तिसऱ्या सामन्यातून वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णा याचा पत्ता कट केला जाणार, अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र टीम मॅनेजमेंटने प्रसिध कृष्णा याच्यावर विश्वास दाखवत त्याला आणखी एक संधी दिली आहे. तर ऑलराउंडर वॉशिंग्टन सुंदर याला तिसर्या सामन्यातून डच्चू देण्यात आला आहे. सुंदरच्या जागी तिलक वर्मा याचा प्लेइंग ईलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे.
तसेच दक्षिण आफ्रिकेच्या 2 खेळाडूंना दुखापतीमुळे अंतिम सामन्यातून बाहेर व्हावं लागलं आहे. नांद्रे बर्गर आणि टॉनी डी झॉर्जी या दोघांना दुखापतीमुळे तिसऱ्या सामन्याला मुकावं लागलं आहे. या दोघांना दुसऱ्या सामन्यात दुखापत झाली होती. या दोघांच्या जागी रायन रिकेल्टन आणि ओटनील बार्टमॅन यांना संधी देण्यात आली आहे.
दरम्यान दोन्ही संघात तिसरा आणि अंतिम सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्यासाठी चुरस आहे. टीम इंडियाने रांचीत पहिला सामना जिंकून मालिकेत विजयी सलामी दिली होती. तर रायपूरमध्ये दक्षिण आफ्रिकेने कमबॅक करत पहिल्या पराभवाची परतफेड केली होती. त्यामुळे आता विशाखापट्टणममध्ये कोणता संघ सीरिज आपल्या नावावर करण्यात यशस्वी ठरणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून आहे.
दक्षिण आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन : टेम्बा बवुमा (कर्णधार), रायन रिकेल्टन, क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), मॅथ्यू ब्रेट्झके, एडन मार्रक्रम, डेवाल्ड ब्रेव्हीस, मार्को यान्सेन, कॉर्बिन बॉश, केशव महाराज, लुंगी एन्गिडी आणि ओटनील बार्टमन.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : केएल राहुल (कॅप्टन आणि विकेटकीपर), रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग आणि प्रसीध कृष्णा.