
शुबमन गिल याच्या नेतृत्वात भारतीय संघाने कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. रोहित शर्मा याने निवृत्ती घेतल्यानंतर शुबमन गिल याला कसोटी संघाचं कर्णधार करण्यात आलं. तेव्हापासून भारतीय संघाने विदेशात 1 आणि मायदेशात 1 अशा 2 कसोटी मालिका खेळल्या आहेत. भारताने इंग्लंडला इंग्लंडमध्ये मालिका जिंकण्यापासून रोखलं. भारताने पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्यात विजय मिळवून मालिका 2-2 ने बरोबरीत सोडवली. त्यानंतर टीम इंडियाने विंडीजला 2-0 अशा फरकाने लोळवलं. त्यानंतर आता टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत खेळण्यासाठी सज्ज झाली आहे.
टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळीतील आपली एकूण तिसरी तर मायदेशातील दुसरी मालिका खेळण्यासाठी सज्ज आहे. टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2 कसोटी सामने खेळणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकेने या मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. शुबमन गिल भारताचं तर टेम्बा बावुमा दक्षिण आफ्रिकेचं नेतृत्व करणार आहे.
उभयसंघातील कसोटी मालिकेला शुक्रवार 14 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. भारतीय संघासमोर गतविजेत्यांचं आव्हान असणार आहे. दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला अंतिम फेरीत पराभूत करत 2023-2025 ही गदा मिळवली होती. तसेच दक्षिण आफ्रिकेच्या ए टीमने भारताला दुसऱ्या अनऑफीशियल टेस्टमध्ये पराभूत केलं होतं. त्यामुळे भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिकेसमोर कस लागेल, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
कसोटी मालिकेतील पहिला सामना हा कोलकातामधील ऐतिहासिक इडन गार्डन्समध्ये होणार आहे. तर दुसरा आणि अंतिम सामना हा गुवाहाटीली बारसपारा क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. हा सामना 22 नोव्हेंबरपासून खेळवण्यात येईल. सामन्याला सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.
दरम्यान टीम इंडियाचा विकेटकीपर बॅट्समन आणि उपकर्णधार ऋषभ पंत दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेतून कसोटी संघात कमबॅक करणार आहे. ऋषभ पंत याला इंग्लंड दौऱ्यात दुखापत झाली होती. त्यामुळे ऋषभ पंतला मायदेशात विंडीज विरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेला मुकावं लागलं होतं. मात्र पंतने दुखापतीवर मात करत फिटनेस सिद्ध केला आहे. त्यामुळे पंत आता पुन्हा एकदा टीम इंडियासह खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. त्यामुळे पंतच्या कामगिरीकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.