
केएल राहुल याच्या नेतृत्वात टीम इंडियाने शनिवारी 6 डिसेंबरला तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर एकतर्फी विजयी साकारला. यशस्वी जैस्वाल याचं शतक तसेच रोहित शर्मा आणि विराट कोहली या अनुभवी जोडीच्या अर्धशतकी तडाखाच्या जोरावर भारताने 271 धावांचं आव्हान हे 39.5 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. भारताने हा सामना 9 विकेट्सने जिंकला. टीम इंडियाने या सामन्यासह मालिका आपल्या नावावर केली. शतकी खेळी करणाऱ्या यशस्वीचा सामनावीर पुरस्कारने गौरव करण्यात आला. तर विराट कोहली मॅन ऑफ द सीरिज ठरला. विराटने या मालिकेत 2 शतक आणि 1 अर्धशतकासह 300 पेक्षा अधिक धावा केल्या. विराटने या मालिकेत अप्रतिम कामगिरी केली. विराटने या मालिकेत एकूण 10 विक्रम मोडीत काढले. विराट नक्की काय काय रेकॉर्ड ब्रेक केले? हे सविस्तर जाणून घेऊयात.
विराटने या मालिकेत सलग 2 शतकं झळकावली. विराट यासह एका फॉर्मेटमध्ये सर्वाधिक शतकं करणारा फलंदाज ठरला. विराटने याबाबतीत माजी दिग्गज सचिन तेंडुलकर याच्या 51 शतकांचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला.
विराट मायदेशात सर्वाधिक शतकं करणारा पहिला फलंदाज ठरला. विराटने मायदेशात एकूण 26 शतकं केली आहेत. तसेच विराटने मायदेशात 25 शतकं करणारा एकमेव फलंदाज होण्याचा बहुमान मिळवला आहे.
विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 22 वेळा मालिकावीर पुरस्कार जिंकणारा खेळाडू ठरलाय. त्याने सचिन तेंडुलकर (20 मालिकावीर पुरस्कार) याला मागे टाकलं आहे.
विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वाधिक 7 एकदिवसीय शतकं करणारा पहिला फलंदाज ठरला आहे.
विराट कोहली आणि रोहित शर्मा सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी भारतीय जोडी ठरली आहे. या दोघांनी आतापर्यंत 394 सामने खेळलेत. रोहित आणि विराटने यासह सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड (391 सामने) यांचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे.
विराटने एकदिवसीय कारकीर्दीत 11 वेळा सलग 2 शतकं केली आहेत. विराटआधी असं कोणत्याही फलंदाजाला करता आलेलं नाही. दक्षिण आफ्रिकेच्या एबी डी व्हीलियर्स याने 6 वेळा अशी कामगिरी केली होती.
विराटने वनडे क्रिकेटमध्ये 9 वेळा सलग 4 किंवा त्यापेक्षा जास्त डावात 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या आहेत. विराटने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 3 डावांआधी ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या अंतिम सामन्यात 74 धावा केल्या होत्या.
विराट एकदिवसीय क्रिकेटमध्ये 34 वेगवेगळ्या ठिकाणी शतक करणारा संयुक्तरित्या पहिला फलंदाज ठरला आहे. विराटने सचिनच्या विश्व विक्रमाची बरोबरी केली आहे.
विराट आणि रोहितने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 20 वेळा शतकी भागीदारी केली आहे. यासह रोहित-विराटने श्रीलंकेच्या कुमार संगकारा आणि तिलकरत्ने दिलशान या माजी जोडीच्या विक्रमाची बरोबरी केली. याबाबतीत हा वर्ल्ड रेकॉर्ड सचिन तेंडुलकर-सौरव गांगुली (26 वेळा शतकी भागीदारी) यांच्या नावावर आहे.
विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिन्ही फॉर्मेटमध्ये मिळून सर्वाधिक वेळा 50 पेक्षा अधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. विराटने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 27 वेळा 50 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.