
टीम इंडिया आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळीतील आपली तिसरी मालिका खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. टीम इंडिया शुबमन गिल याच्या नेतृत्वात आतापर्यंत या साखळीत अजिंक्य आहे. भारताने इंग्लंड विरुद्धची मालिका 2-2 ने बरोबरीत सोडवली. त्यानंतर भारताने वेस्ट इंडिजचा मायदेशात झालेल्या कसोटी मालिकेत 2-0 ने सुपडा साफ केला. त्यानंतर आता शुबमन सेना या साखळीतील आपली एकूण तिसरी तर मायदेशातील दुसरी कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेत भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान आहे. उभयसंघात एकूण 2 कसोटी सामने खेळवण्यात येणार आहेत. या मालिकेचा श्रीगणेशा 14 नोव्हेंबरपासून होणार आहे. भारताचा ही मालिका जिंकण्याचा प्रयत्न असणार आहे. भारतीय कर्णधार शुबमन गिल याला या मालिकेत पाकिस्तानचा अनुभवी फलंदाज बाबर आझम याला मागे टाकण्याची संधी आहे.
शुबमनकडे बाबरचा रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी आहे. बाबर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा आशियाई फलंदाज आहे. मात्र बाबरचा हाच रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी शुबमनला अवघ्या काही धावांचीच गरज आहे. त्यामुळे शुबमन याच मालिकेच बाबरला मागे टाकेल, असा विश्वास चाहत्यांना आहे.
शुबमनने आतापर्यंत 2025-2027 या साखळीत एकूण 7 सामने खेळले आहेत. शुबमनने या साखळीपासूनच कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. शुबमनने या 13 डावांमध्ये 78.83 च्या सरासरीने 946 धावा केल्या आहेत. शुबमनने या दरम्यान 5 शतकं आणि 6 अर्धशतकं झळकावली आहेत. शुबमनला आता साखळीत 1 हजार धावांसाठी फक्त 54 धावांची गरज आहेत. शुबमन यासह या साखळीत 1 हजार धावा करणारा पहिला फलंदाज ठरेल.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक धावांचा विक्रम हा इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रुट याच्या नावावर आहे. तर बाबर या यादीत सातव्या स्थानी आहे. बाबरने एकूण 3 हजार 129 तर शुबमनने 2 हजार 893 धावा केल्या आहेत. तर शुबमन गिल हा बाबरनंतर या स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा दुसरा आशियाई फलंदाज आहे. शुबमनने 39 सामन्यांमधील 72 डावांत 43.01 च्या सरासरीने 2 हजार 839 धावा केल्या आहेत. त्यामुळे बाबरला पछाडण्यासाठी शुबमनला आणखी 291 धावांची गरज आहे. शुबमनकडे या 291 धावा करण्यासाठी 2 सामने अर्थात 4 डाव आहेत.
दरम्यान डब्ल्यूटीसी स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक रन्सचा वर्ल्ड रेकॉर्ड हा जो रुटच्या नाववर आहे. रुटने 126 डावांत 6 हजारांपेक्षा अधिक धावा केल्या आहेत. रुटने 6 हजार 80 धावा केल्या आहेत. तसेच रुट या स्पर्धेच्या इतिहासात 5 हजार करणारा एकमेव फलंदाज आहे.