
टीम इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा आणि अंतिम कसोटी सामना हा 10 ते 14 ऑक्टोबर दरम्यान नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. या सामन्याला सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 9 वाजता टॉस झाला. भारताच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कर्णधार शुबमन गिल याने बॅटिंगचा निर्णय घेत विंडीजला बॉलिंगसाठी भाग पाडलं आहे. शुबमनने या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. शुबमनने आपल्या पहिल्या कसोटीतील प्लेइंग ईलेव्हनसोबत मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
कॅप्टन म्हणून शुबमन गिल याचा हा सातवा कसोटी सामना आणि दुसरीच मालिका आहे. शुबमनने रोहित शर्मा याच्या निवृत्तीनंतर इंग्लंड विरूद्धच्या कसोटी मालिकेतून कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारली होती. भारताने ही 5 सामन्यांची मालिका 2-2 ने बरोबरीत सोडवली होती. या मालिकेतील पाचही सामन्यात शुबमनच्या विरोधातच नाणेफेकीचा कौल लागला होता. त्यानंतर विंडीज विरूद्धच्या पहिल्या कसोटीतही शुबमनच्या विरोधातच टॉसचा निर्णय लागला. मात्र अखेर दिल्लीत जाऊन शुबमन टॉसचा बॉस ठरला.
शुबमन कसोटी क्रिकेटमध्ये 6 सामन्यांनंतर टॉस जिंकणारा संयुक्तरित्या दुसरा आणि एकूण तिसरा कर्णधार ठरला आहे. बेव्हन काँग्डन यांना आपल्या बाजूने टॉसचा निर्णय लागण्यासाठी 7 कसोटी सामन्यांची प्रतिक्षा करावी लागली होती. तर टॉम लॅथम याच्या बाजूने शुबमनप्रमाणे 6 व्या कसोटीनंतर नाणेफेकीचा कौल लागला होता. त्यानंतर आता शुबमनने टॉमच्या विक्रमाची बरोबरी साधली आहे.
शुबमनने टॉस जिंकल्यानंतर टीम इंडियातील सहकाऱ्यांनी आपल्या कर्णधारांचं अभिनंदन केलं. यावेळेस शुबमन आणि उपस्थित खेळाडूंमध्ये एकच हशा पिकला.
दरम्यान टीम इंडिया या 2 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. भारताने पहिला सामना हा अडीच दिवसात डाव आणि 140 धावांनी जिंकला होता. त्यामुळे आता टीम इंडियाकडे मालिका 2-0 ने जिंकण्याची संधी आहे.
वेस्ट इंडीज प्लेइंग इलेव्हन : जॉन कॅम्पबेल, टॅगेनारिन चंद्रपॉल, ॲलिक अथानाझे, शाई होप, रोस्टन चेस (कॅप्टन), टेविन इम्लाच (विकेटकीपर), जस्टिन ग्रीव्हस, जोमेल वॅरिकन, खारी पियरे, अँडरसन फिलिप आणि जेडेन सील्स.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुबमन गिल (कॅप्टन), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.