IND vs ZIM : “शुबमन गिल कर्णधार नसताना…”, रियान परागने व्यक्त केल्या अशा भावना
टीम इंडियाने झिम्बाब्वेला 4-1 ने पराभूत करत मालिका खिशात घातली. या मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर टीम इंडियाने झिम्बाब्वेला विजयाची पुन्हा संधी दिली. उर्वरित चारही सामने एकहाती जिंकले. या मालिकेत रियान पराग पदार्पणाची संधी मिळाली. पण पहिल्या दोन सामन्यानंत तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यात बसवलं गेलं. पाचव्या सामन्यात कमबॅक केलं.

भारत विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यातील पाच सामन्यांची टी20 मालिका पार पडली. ही मालिका भारताने 4-1 ने जिंकली. या मालिकेत पाच खेळाडूंनी पदार्पण केलं. यात रियान परागचंही नाव होतं. देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमधील त्याची कामगिरी पाहून त्याला संघात स्थान मिळालं. पण पहिल्याच सामन्यात काही खास करू शकला नाही. त्याला फक्त दोन धावा करता आल्या. दुसऱ्या सामन्यात त्याच्या वाटेला फलंदाजीच आली नाही. तर तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही. पण पाचव्या सामन्यात त्याला संधी मिळाली आणि संजू सॅमसनसोबत मोक्याच्या क्षणी चांगली भागीदारी केली. रियान पराग आणि संजू सॅमसन यांनी 65 धावांची भागीदारी केली. रियानने 24 चेंडूत एका षटकाराच्या मदतीने 22 धावा केल्या. आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर त्याची ही खेळी महत्त्वाची ठरली.
“आज खूप भरं वाटत आहे. पहिल्या सामन्यात पराभव झाल्यानंतर सर्वच खडबडून जागे झाले. त्यामुळे आम्ही भानावर आलो. संघ सहकाऱ्यांचा खरंच अभिमान आहे. या मालिकेत मजा आली.” असं रियान पराग म्हणाला. अभिषेक शर्माबाबत प्रश्न विचारताच रियानने सांगितलं की, “आम्ही या जर्सीसह ओपन केलं होतं. 2018 वर्ल्डकपमध्ये आम्ही एकत्र खेळलो. पण त्यानंतर सहा वर्षे खेळण्याची संधी मिळाली नाही. आता आम्ही पुन्हा एकत्र खेळत आहोत.”
संजू सॅमसनसोबतच्या भागीदारीबाबही त्याने आपलं मत व्यक्त केलं. “मी संजूसोबत बोलत होतो की आपल्याला राजस्थान रॉयल्ससारखी पार्टनरशिप करावी लागेल. ही एक अवघड विकेट होती. आम्ही चांगली कामगिरी करू शकलो याचा अभिमान आहे.” रियान परागला यानंतर शुबमन गिलच्या कर्णधारपदाबाबत विचारलं गेलं. “शुबमनच्या नेतृत्वात खेळणं खरंच आनंददायी आहे. आम्ही अंडर 16 मध्ये एकत्र खेळलो आहोत. तेव्हा तो कर्णधार नसताना कर्णधारासारखाच राहीला. तो खरंच अपवाद आहे.”, असं रियान परागने शुबमन गिलबाबत सांगितलं. दरम्यान भारतीय संघ आता श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी कोणत्या खेळाडूंची निवड होणार हा देखील प्रश्न आहे. त्यामुळे झिम्बाब्वे दौऱ्यानंतर खेळाडूंची धाकधूक वाढणार आहे.
