IND W vs PAK W: रनआऊट की नाही? पाकिस्तानची कर्णधार पंचांना भिडली, आयसीसी नियम काय सांगतो?

वुमन्स वर्ल्डकप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानय यांच्यात सामना होत आहे. या सामन्यात भारताला मुनीबा अली सिद्दकीच्या रुपाने पहिलं यश मिळालं. धावचीत होत तिला तंबूत परतावं लागलं. पण आता तिच्या विकेटमुळे वादाला फोडणी मिळाली आहे.

IND W vs PAK W: रनआऊट की नाही? पाकिस्तानची कर्णधार पंचांना भिडली, आयसीसी नियम काय सांगतो?
IND W vs PAK W: रनआऊट की नाही? पाकिस्तानची कर्णधार पंचांना भिडली, आयसीसी नियम काय सांगतो?
Image Credit source: PTI
| Updated on: Oct 05, 2025 | 9:39 PM

आयसीसी वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या सहाव्या सामन्यात भारत आणि पाकिस्तान हे संघ आमनेसामने आले आहेत. या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने या सामन्यात 50 षटकात सर्व गडी गमवून 247 धावा केल्या आणि विजयासाठी 248 धावांचं आव्हान दिलं. या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानने सावध सुरुवात केली. पण पाकिस्तानला पहिलाच धक्का मुनीबा अली सिद्दकीच्या रुपाने बसला. चौथ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर विकेट मिळाली. क्रांती गौडच्या गोलंदाजीवर तिच्या पॅडला चेंडू लागला होता. यासाठी क्रांती जोरदार अपील केली. पण पंचांनी नाबाद दिलं. पण या दरम्यान मुनीबा अलीने क्रीझ सोडलं होतं. या संधीचं दीप्ती शर्माने सोनं केलं आणि स्टंपवर थ्रो केला. यावेळी मुनीबाने बॅट वर उचलली होती आणि तेव्हाच चेंडू स्टंपवर आदळला. तिची बॅट जमिनीपासून थोडी वर होती. तसेच शरीरही क्रीझबाहेर होते. म्हणून पंचांनी तिला बाद दिलं. यामुळे मुनीबाने नाराजी व्यक्त केली.

विचित्र पद्धतीने धावचीत दिल्याने पाकिस्तानची कर्णधार फातिमा सना वैतागली. या विकेटनंतर फातिमा सनाने थेट पंचांना धारेवर धरलं. तिसऱ्या पंचांनी बाद दिल्यानंतर काही काळ पाकिस्तानची कर्णधार फातिमा सना आणि पंचांमध्ये वाद झाला. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिने मैदानाबाहेर उपस्थित असलेल्या चौथ्या पंचांशी वाद घातला. त्यामुळे मुनीबा हा वाद निकाली लागेपर्यंत मैदान सोडलं नाही. पाकिस्तानचा संघही यामुळे नाराज होता. पण पंचांनी निर्णय कायम ठेवला आणि मुनीबाला बाद होत तंबूत परतावं लागलं. यामुळे नव्या वादाला फोडणी मिळाली आहे.

काय सांगतो आयसीसीचा नियम?

आयसीसीच्या नियम 30.1 नुसार चेंडू स्टंपला लागला तेव्हा फलंदाजाचं शरीर किंवा बॅट क्रीजच्या बाहेर असेल तर त्याला आऊट दिलं जातं. नियम 30.12 नुसार फलंदाजाने क्रिजमध्य आपली बॅट ठेवली नाही आणि त्याची बॉडी क्रीजच्या बाहेर असेल तर त्याला रनआऊट दिलं जातं. फलंदाजाला क्रिजमध्ये चेंडू डेड होईपर्यंत थांबावं लागतं. यामुळेच मुनीबाला बाद दिलं गेलं. कारण जेव्हा स्टंपवर चेंडू आदळला तेव्हा बॅट वर उचलली होती आणि तिचं शरीर क्रीजच्या बाहेर होतं.