
अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील साखळी फेरीच्या शेवटच्या सामन्यात भारत न्यूझीलंड हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 7 गडी राखून पराभव केला आणि पाकिस्तानशी सामना करणार यावर शिक्कामोर्तब केलं. भारत आणि पाकिस्तान यांच्यात 1 फेब्रुवारीला सामना होणार आहे. कारण ब आणि क गटातील प्रत्येकी 3 संघांनी सुपर सिक्स फेरीत एन्ट्री घेतली आहे. यात ब गटातून भारत, बांग्लादेश, न्यूझीलंड आणि क गटातून झिम्बाब्बे, पाकिस्तान आणि इंग्लंडने एन्ट्री मारली आहे. असं असलं तर या गटात एक गणित होतं. भारताने न्यूझीलंडविरुद्धचा सामना गमावला असता तर पाकिस्तानशी लढत झाली नसती. पण हा सामना जिंकला आणि पाकिस्तानविरुद्ध सामना होणार हे ठरलं. त्यामुळे क्रीडारसिकांना पुन्हा एकदा हायव्होल्टेज सामना पाहायला मिळणार आहे. या सामन्यात नो हँड शेक पॉलिशी कायम असेल यात काही शंका नाही.
भारतीय संघ ब गटात होता आणि या गटात भारत, बांग्लादेश, न्यूझीलंड आणि अमेरिका हे संघ होते. भारताने या गटात तीन पैकी 3 सामने जिंकले आणि गटात अव्वल स्थान गाठलं. तर बांगलादेशने 3 पैकी 1 विजय, 1 पराभव आणि एक सामना ड्रॉ झाल्याने 3 गुणांसह दुसरं स्थान गाठलं. न्यूझीलंडचा संघ 3 पैकी एका सामन्यात विजय आणि दोन सामन्यात पराभूत झाला. यासह खात्यात 2 गुण होते आणि तिसर्या स्थानी राहीला. तर अमेरिकेचा संघ या स्पर्धेतून आऊट झाला. भारताने या गटात अव्वल स्थान राखलं आणि पाकिस्तानसोबत खेळणार हे स्पष्ट झालं. कारण क गटात पाकिस्तानचा संघ दुसऱ्या स्थानावर होता.
सुपर सिक्स फेरीत भारताचा इंग्लंडशी, पाकिस्तानचा बांगलादेशशी आणि झिम्बाब्वेचा न्यूझीलंडशी सामना होणार नाही. कारण हे संघ आपआपल्या गटात सारख्याच क्रमांकावर होते. त्यामुळे भारताचा पाकिस्तान आणि झिम्बाब्वेशी, बांगलादेशशचा इंग्लंड आणि झिम्बाब्वेशी, न्यूझीलंडचा इंग्लंड आणि पाकिस्तानशी सामना होईल. भारताचा 27 जानेवारीला झिम्बाब्वे, 1 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानशी सामना होईल. सुपर सिक्स फेरीत टॉपला असलेल्या दोन संघांना उपांत्य फेरीचं तिकीट मिळणार आहे. त्यामुळे नुसते दोन्ही सामने जिंकून चालणार नाही तर नेट रनरेटही चांगला ठेववा लागणार आहे.