U19 WC 2026 : भारताने न्यूझीलंडला 7 गडी राखून केलं पराभूत, आयुष म्हात्रेला सूर गवसला
अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील साखळी फेरीच्या अंतिम सामन्यात भारत न्यूझीलंड यांच्यात लढत झाली. हा सामना भारताने 7 गडी राखून जिंकला. या सामन्यात कर्णधार आयुष म्हात्रेने आक्रमक खेळीचं दर्शन घडवलं.

अंडर 19 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या साखळी फेरीच्या अंतिम सामन्यात भारताची लढत न्यूझीलंडशी झाली. भारताने नाणेफेकीच कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय योग्यच ठरला असं म्हणावं लागेल. कारण भारतीय गोलंदाजांसमोर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी नांगी टाकली. न्यूझीलंडचा संपूर्ण संघ अवग्या 135 धावांवर बाद झाला. न्यूझीलंडचा 36.2 षटकात खेळ आटोपला. भारताने हे लक्ष्य फक्त 3 गडी गमवून पूर्ण केलं. पावसामुळे हा सामना 37 षटकांचा करण्यात आला होता. पण हे आव्हान भारताने 14व्या षटकात पूर्ण केलं. न्यूझीलंडच्या फलंदाजांना भारतीय गोलंदाजांना दिवसा तारे दाखवले. पाच फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला. तर इतर फलंदाज एकेरी धावांवर तंबूत परतले.
न्यूझीलंडकडून आर्यन मन्न 5, हुगो बॉज 4, टॉम जोनस 2, स्नेहिथ रेड्डी 10, मार्को अल्पे 1, जेकॉब कॉट्टर 23, जसकरण सांधू 18, सेल्विन संजयर 28, फ्लायन मोरे 1 आणि मेसन क्लार्क 4 धावा करून बाद झाले. तर कॅलम सॅमसन नाबाद 37 धावांवर राहिला. भारताकडून आरएस अंब्रिशने सर्वाधिक 4 विकेट काढल्या. त्याने 8 षटकात 29 धावा देत 4 गडी बाद केले. तर हेनिल पटेलने 7.2 षटकात 3 विकेट काढल्या. खिलान पटेल, मोहम्मद एन्नान, कनिष्क चौहान यांनी प्रत्येकी एक विकेट काढली. त्यांनी न्यूझीलंडच्या फलंदाजांना डोकं वर काढू दिलं नाही. न्यूझीलंडचे फलंदाज धावा काढण्यासाठी धडपडताना दिसले.
न्यूझीलंडने विजयासाठी दिलेल्या धावांचा पाठलाग करण्यासाठी वैभव सूर्यवंशीसोबत मैदानात एरोन जॉर्ज उतरला होता. पण एरोन जॉर्ज काही खास करू शकला नाही. अवघ्या 7 धावा करून तंबूत परतला. त्यानंतर वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे यांनी आक्रमक खेळीचं दर्शन घडवलं. या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी 76 धावांची भागीदारी केली. वैभव सूर्यवंशीने 23 चेंडूत 2 चौकार आणि 3 षटकार मारत 40 धावा केल्या. तर कर्णधार आयुष म्हात्रेला या सामन्यात सूर गवसला. वैभव सूर्यवंशीसोबत सलामीला नाही. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर तुटून पडला. त्याने 27 चेंडूत 2 चौकार आणि 6 षटकार मारत 53 धावांची खेळी केली. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 196.30 चा होता.
