
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील सुरूवातीचे तीन सामने जिंकून भारताने मालिका खिशात घातली आहे. न्यूझीलंडने भारताला विजयासाठी 154 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान भारताने 10 षटकात फक्त 2 गडी गमवून पूर्ण केलं. अभिषेक शर्माने नाबाद 68 धावा आणि कर्णधार सूर्यकुमार यादवने नाबाद 57 धावांची खेळी केली. तिसऱ्या सामन्यात नाणेफेकीचा कौल भारताने जिंकला. कर्णधार सूर्यकुमार यादवने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तसं पाहिलं तर ही खेळपट्टी फलंदाजीसाठी पूरक होती. पण न्यूझीलंडच्या फलंदाजांना 153 धावांवर रोखण्याचं काम भारतीय गोलंदाजांनी केली. यात जसप्रीत बुमराह आणि रवि बिश्नोईचा स्पेल खूप महत्त्वाचा ठरला. इतकंच काय तर हार्षित राणा आणि हार्दिक पांड्या यांनी पहिल्या षटकापासून न्यूझीलंडच्या फलंदाजांवर दबाव टाकला. त्यामुळे न्यूझीलंडला भारतासमोर मोठी धावसंख्या करण्यात अपयश आलं.
न्यूझीलंडने 20 षटकात 9 गडी गमवून 153 धावा केल्या आणि विजयासाठी 154 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान तसं पाहिलं तर भारतासाठी सोपं होतं. पण भारताची सुरूवात काही चांगली झाली नाही. न्यूझीलंडने विजयासाठी दिलेलं 154 धावांचं आव्हान गाठण्यासाठी संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा ही जोडी मैदानात आली होती. पण पहिल्याच चेंडूवर संजू सॅमसन बाद झाला. गोल्डन डकवर बाद झाल्याने आता पुढच्या सामन्यात त्याला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळणं कठीण दिसत आहे. भारतीय संघ दबावात येईल असं वाटत होतं. पण इशान किशनने पहिल्या चेंडूपासूनच आक्रमण केलं आणि भारतावरील दडपण दूर केलं. पहिल्या चेंडूवर विकेट पडल्यानंतही त्या षटकात 16 धावा काढल्या. यामुळे पुन्हा न्यूझीलंडवर दबाव वाढला. इशान किशन आणि अभिषेक शर्मा तुटून पडले. या जोडीने 53 धावांची भागीदारी केली. इशान किशन एक फटका मारताना चुकला आणि विकेट देऊन बसला. असं असूनही अभिषेक शर्मा काही थांबला नाही.
पावरप्लेमध्ये भारताने 2 गडी गमवून 94 धावा केल्या. यामुळे न्यूझीलंडचा संघ पूर्णपणे बॅकफूटवर गेला. अभिषेक शर्माने 14 चेंडूत अर्धशतक ठोकलं. त्याला सूर्यकुमार यादवची साथ लाभली.