IND vs NZ : एजाज पटेलचा ‘चौकार’, मयंक अग्रवालचं शतक, टीम इंडियाची दिवसअखेर 4 बाद 214 पर्यंत मजल

नाणेफेक जिंकून कर्णधाराने घेतलेला फलंदाजीचा निर्णय भारतीय सलामीवीरांनी योग्य ठरवला. मयंक अग्रवाल आणि शुभमन गिल या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 80 धावांची भागीदारी केली.

IND vs NZ : एजाज पटेलचा 'चौकार', मयंक अग्रवालचं शतक, टीम इंडियाची दिवसअखेर 4 बाद 214 पर्यंत मजल
Mayank Agarwal

मुंबई : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना आजपासून मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जात आहे. आज या सामन्याचा पहिला दिवस होता. पावसामुळे उशिरा सुरू झालेल्या या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र तोपर्यंत पहिलं सत्र वाया गेलं होतं. त्यामुळे आज केवळ दोन सत्र खेळवण्यात आली आहे. यामध्ये भारताने 70 षटकांमध्ये 4 गड्यांच्या बदल्यात 214 धावा केल्या आहेत. मयंक अग्रवालच्या शतकाच्या जोरावर भारताने पहिला दिवस आपल्या नावे केला.

नाणेफेक जिंकून कर्णधाराने घेतलेला फलंदाजीचा निर्णय भारतीय सलामीवीरांनी योग्य ठरवला. मयंक अग्रवाल आणि शुभमन गिल या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 80 धावांची भागीदारी केली. मात्र न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेलने भारताची बिनबाद 80 वरुन 3 बाद 80 अशी अवस्था करुन ठेवली. त्याने आधी 44 धावांवर असलेल्या शुभमन गिलला बाद केलं. त्यानंतर एजाजने एकाच षटकात चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली या दोघांना पव्हेलियनचा रस्ता दाखवला. पुजारा आणि कोहली भोपळादेखील फोडू शकले नाहीत. त्यानंतर आलेल्या श्रेयस अय्यरलादेखील एजाजने फार वेळ मैदानात टिकू दिलं नाही. अय्यर 18 धावांवर बाद झाला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या ऋद्धीमान साहाने पडझड होऊ दिली नाही. अग्रवाल आणि साहा या दोघांनी 5 व्या विकेटसाटी आतापर्यंत नाबाद 61 धावांची भागीदारी रचली आहे.

मयंक अग्रवालने 196 चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं. त्यानंतरही त्याने संयमी फलंदाजी सुरुच ठेवली दिवसअखेर त्याने 246 चेंडूत 120 धावा केल्या होत्या. यात 14 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश आहे. तसेच ऋद्धीमान साहा 25 धावांवर नाबाद खेळत आहे. दरम्यान, भारताचे चारही फलंदाज एजाज पटेलने बाद केले. त्याने 29 षटकं गोलंदाजी केली. त्यापैकी 10 षटकं निर्धाव टाकली. तसेच 73 धावा देत त्याने 4 बळी घेतले. पटेलव्यतिरिक्त न्यूझीलंडच्या कोणत्याही गोलंदाजाला यश आलं नाही.

उभय संघांमधील पहिला सामना कानपूरमध्ये खेळवण्यात आला होता, जो अनिर्णित राहिला. सध्या सुरु असलेल्या सामन्यात दोन्ही संघांना विजय मिळवायचा आहे.

अजिंक्य, इशांत, जाडेजा बाहेर

दुखापतीमुळे इशांत शर्मा, अजिंक्य रहाणे, रवींद्र जाडेजा या बड्या खेळाडूंना संघाबाहेर जावे लागले आहे. यांच्या जागी जयंत यादव आणि मोहम्मद सिराज यांना संघात स्थान मिळाले आहे. यासोबतच विराट कोहलीनेदेखील या सामन्यातून पुनरागमन केलं आहे. दुसऱ्या बाजूला केन विल्यमसनच्या कोपराला झालेल्या दुखापतीने डोकं वर काढलं आहे. त्यामुळेच न्यूझीलंड संघ व्यवस्थापनाने त्याला विश्रांती दिली आहे. त्याच्या जागी डॅरिल मिशेलला संघात संधी मिळाली आहे.

इतर बातम्या

Ajinkya rahne : अजिंक्य राहणेचं टेस्ट करिअर धोक्यात? दुसऱ्या कसोटीतून राहणेला वगळलं

IND vs NZ | विराट कोहली पुन्हा 0 वर बाद, अंपायरच्या निर्णयावर सवाल उपस्थित

IND vs NZ | सुमार कामगिरी की दुखापत, लोकल बॉय रहाणेच्या डच्चूमागील कारण काय?


Published On - 6:15 pm, Fri, 3 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI