चेतेश्वर पुजाराची जागा भरणं झालं कठीण, सात सामन्यात पाच खेळाडूंवर लावला डाव; पण…
भारतीय संघाची गेल्या काही मालिकांपासून कसोटी क्रिकेटमध्ये पिछेहाट सुरु झाली आहे. न्यूझीलंडकडून कसोटी मालिका गमावल्यापासून पराभवाचं ग्रहण लागलं आहे. असं असताना चेतेश्वर पुजाराची जागा भरून काढणं देखील कठीण झालं आहे.

भारताने मागच्या काही वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये नावलौकीक मिळवला आहे. दोन वेळा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठली होती. पण मागच्या दोन मालिकांपासून भारतीय संघाला पराभवाने ग्रासलं आहे. त्यामुळे तिसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरी गाठण्याचं स्वप्न भंगलं. असं असताना कसोटी संघात केलेले प्रयोगही निष्फळ ठरत आहे. यात चेतेश्वर पुजाराची जागा कशी भरावी? हा यक्ष प्रश्न पडला आहे. कारण गेल्या एक दशकापासून चेतेश्वर पुजारा तिसऱ्या क्रमांकावर कसोटीत खेळत आहे. पण 2023 पासून त्याला टीम इंडियातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. त्याच्या जागेवर कर्णधार शुबमन गिल यानेही नशिब पारखलं. पण त्यात त्याला काही यश आलं नाही. या क्रमांकावर मागच्या सात सामन्यात पाच खेळाडू खेळले. पण सर्वच्या सर्व खेळाडू फ्लॉप गेले. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत करुण नायरला संधी दिली होती. पण करूण नायर 31 धावा करून तंबूत परतला.
शुबमन गिलने या नंबरवर 30 डाव खेळले. पण त्याने 38 च्या सरासरीने 1019 धावा केल्या. यात तीन शतकं आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर शुबमन गिल आता चौथ्या क्रमांकावर खेळत आहे. चेतेश्वर पुजाराच्या जागेचा शोध घेण्याची मोहीम बॉर्डर गावस्कर ट्रॉफीपासून झाली होती. पहिल्या कसोटीत देवदत्त पड्डिकल संधी दिली होती. पण 25 धावा करून बाद झाला.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या, तिसऱ्या आणि पाचव्या कसोटीत शुबमन गिल या क्रमांकावर खेळला. पण त्याने तीन सामन्यात फक्त 93 धावा केल्या. चौथ्या सामन्यात केएल राहुल तिसऱ्या क्रमांकावर उतरला होता. त्याने पहिल्या डावात 24 आणि दुसऱ्या डावात शून्यावर बाद झाला. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत शुबमन गिलने तिसऱ्या क्रमांकासाठी साई सुदर्शनला संधी दिली. पण तो देखील काही खास करू शकला नाही.
चेतेश्वर पुजाराने तिसऱ्या क्रमांकावर खेळताना दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने भारतासाठी या क्रमांकावर 155 डाव खेळला. यात त्याने 45 च्या सरासरीने 6529 धावा केल्या. यात 32 अर्धशतक आणि 18 शतकांचा समावेश आहे.
