संजू सॅमसनचं पुन्हा नशिब फुटकं! खेळण्याची संधी चालून आली होती, पण…

भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्या पाच सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. पहिल्या तीन सामन्यात बेंचवर बसलेल्या संजू सॅमसनसाठी चौथ्या सामन्यात संधी होती. पण यावेळी त्याचं नशिब फुटकं निघालं.

संजू सॅमसनचं पुन्हा नशिब फुटकं! खेळण्याची संधी चालून आली होती, पण...
संजू सॅमसनचं पुन्हा नशिब फुटकं! खेळण्याची संधी चालून आली होती, पण...
Image Credit source: PTI
| Updated on: Dec 17, 2025 | 10:17 PM

टीम इंडियाचा कसोटी आणि वनडे कर्णधार शुबमन गिलकडे टी20 संघाचं उपकर्णधारपद आहे. त्याच्याकडे भविष्याचं कर्णधार म्हणून पाहिलं जात आहे. पण त्याला टी20 संघात वारंवार संधी दिली जात आहे. असं असूनही त्याला संधीचं सोनं करता आलेलं नाही. त्यामुळे त्याच्या पदरी वारंवार निराशा पडत आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही त्याने फ्लॉप शो केला. आता दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या सुरुवातीच्या तीन सामन्यातही काही खास करू शकला नाही. त्यामुळे त्याच्यावर सर्वच स्तरातून टीकेची झोड उठत आहे. त्याच्यामुळे फॉर्मात असलेल्या संजू सॅमसनला बेंचवर बसावं लागत असल्याने क्रीडाप्रेमींनी नाराजी व्यक्त केली होती. चौथ्या टी20 सामन्यात खरं तर संजू सॅमसनला प्लेइंग 11 मध्ये खेळण्याची संधी चालून आली होती. पण येथेही तो कमनशिबी निघाला. चौथा टी20 सामना दाट धुक्यामुळे रद्द केला गेला. त्यामुळे संजू सॅमसनच्या पदरी निराशा पडली.

चौथ्या टी20 सामन्यापूर्वी शुबमन गिलच्या पायाला दुखापत झाल्याचं समोर आलं. त्यामुळे चौथ्या सामन्यात खेळणार नाही स्पष्ट झालं होतं. तशा बातम्याही समोर आल्या होत्या. त्यामुळे अभिषेक शर्मासोबत संजू सॅमसन ओपनिंग करेल ही जवळपास निश्चित झालं होतं. पण सामना न झाल्याने संजू सॅमसनच्या चाहत्यांचा हिरमोड झाला. आता पाचव्या सामन्यात शुबमन गिल फिट झाला तर काय? पुन्हा संजू सॅमसनला बेंचवर बसून सामना पाहण्याची वेळ येईल. त्यामुळे त्याला मिळालेली एक संधी आता धुक्याने हिरावून घेतली असंच म्हणावं लागेल. पाचवा टी20 सामना 19 डिसेंबरला होणार आहे. या सामन्यातील प्लेइंग 11 बाबत उत्सुकता आहे. दोन दिवसात शुबमन गिल फिट होईल की नाही? याबाबतही चर्चा रंगली आहे.

पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील चार सामन्यांचा निर्णय झाला. दोन सामन्यात भारताने, तर एका सामन्यात दक्षिण अफ्रिकेने विजय मिळवला आहे. एक सामना धुक्यामुळे रद्द झाला आहे. त्यामुळे सामन्यात भारताने 2-1 ने आघाडी घेतली आहे. दक्षिण अफ्रिकेची मालिका विजयाची संधी आता हुकली आहे. कारण शेवटचा सामना दक्षिण अफ्रिकेने जिंकला तरी ही मालिका 2-2 ने बरोबरीत सुटेल. भारताने जिंकला तर ही मालिका 3-1 ने खिशात घालेल. आता ही मालिका बरोबरीत सुटते की भारत जिंकतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.