इंडियन कोच, 5 माजी सिलेक्टर्स सर्वांची एकमुखी मागणी, ‘त्याला’ टीममध्ये घ्याच
आशिया कप स्पर्धेत टीम इंडियाने निराश केलं. विजेतेपदाचा दावेदार म्हणून टीम इंडिया दुबईत दाखल झाली होती. पण सुपर 4 फेरीत टीम इंडियाचं आव्हान संपुष्टात आलं.

मुंबई: आशिया कप स्पर्धेत टीम इंडियाने निराश केलं. विजेतेपदाचा दावेदार म्हणून टीम इंडिया दुबईत दाखल झाली होती. पण सुपर 4 फेरीत टीम इंडियाचं आव्हान संपुष्टात आलं. पाकिस्तान, श्रीलंका या टीम्सकडून टीम इंडियाला पराभव स्वीकारावा लागला. आशिया कपमधील ही कामगिरी पाहून आगामी टी 20 वर्ल्ड कप मधील टीम इंडियाच्या प्रदर्शनाबद्दल अनेकांच्या मनात शंका निर्माण झाली आहे.
संघात अनेक बदल केले
अनेक माजी क्रिकेटपटू, विश्लेषकांनी टीम इंडियाच्या निवडीवर आणि बदलांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. द्रविड-रोहित जोडीने वर्ल्ड कपआधी संघात अनेक बदल केले. या बदलांमुळेच टीम इंडियाच्या कामगिरीत सातत्य नाहीय, असं काही क्रिकेट तज्ज्ञांच मत आहे.
जसप्रीत बुमराह खेळणार नाही?
आशिया कपसाठी मोहम्मद शमीचा संघात समावेश केला नव्हता. मोहम्मद शमीच्या वयाचा विचार करुन, वनडे आणि टेस्ट टीममध्येच त्याची निवड केली जाते. जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल टी 20 वर्ल्ड कपमध्ये खेळणार? हे अजून स्पष्ट नाहीय. अशावेळी मोहम्मद शमीच्या अनुभवाचा फायदा करुन घ्यावा, असं अनेक क्रिकेट विश्लेषकांच मत आहे.
दिग्गजांची एकमुखी मागणी
बुमराह आणि हर्षल पटेल खेळणार नसतील, तर अनुभवी मोहम्मद शमीचा टीममध्ये समावेश करावा, अशी मागणी होत आहे. त्यामुळे सिलेक्टर्सवर शमीच्या निवडीवरुन दबाव आहे. दिवसेंदिवस मोहम्मद शमीच्या समावेशाची मागणी जोर धरु लागली आहे. रवी शास्त्री, किरण मोरे यांच्यासह काही दिग्गजांनी तात्काळ मोहम्मद शमीचा संघात समावेश करण्याची मागणी केली आहे.
निवड समितीची बैठक कधी?
येत्या 16 सप्टेंबरला बीसीसीआयच्या निवड समितीची बैठक होणार आहे. त्याचदिवशी निवड समिती टी 20 वर्ल्ड कप आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी टीम जाहीर करणार आहे. टीम मॅनेजमेंट आणि सिलेक्टर्सकडे फार वेळ नाहीय. अंतिम निर्णय घेण्याआधी ते जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेलच्या फिटनेस रिपोर्टसाठी थांबले आहेत. आशिया कपमधील टीम इंडियाची कामगिरी सिलेक्शन कमिटीसाठी एक धडा आहे.
