कर्णधार लक्ष्यचं शतक, ज्युनियर सेहवागही चालला, टीम इंडियाकडून 3-0ने ऑस्ट्रेलियाला व्हाईटवॉश
ऑस्ट्रेलियाने 254 धावा केल्या, पण भारताने 42व्या षटकातच सामना 6 विकेट्सने जिंकला. या विजयासह भारतीय अंडर-19 संघाने मालिकेत 3-0 असा क्लीन स्वीप केला. या विजयात कर्णधार लक्ष्य रायचंदानीच्या शतकाची विशेष चर्चा होत आहे.

भारतीय अंडर-19 संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या अनधिकृत वनडे सामन्यात 6 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारताने 3 सामन्यांची मालिका 3-0 अशी जिंकत ऑस्ट्रेलियावर निर्भेळ यश मिळवले. निरंजन शाह स्टेडियमवर झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 254 धावा केल्या होत्या. भारताने हे आव्हान अवघ्या 42 षटकांत 4 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले.
ऑस्ट्रेलियाची चांगली सुरुवात, पण गोलंदाजांनी डाव सावरला
नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाला सलामीवीर जेड होलिकने चांगली सुरुवात करून दिली. चार्ली हेनडरसनसोबत त्याने पहिल्या विकेटसाठी 64 धावांची भागीदारी केली. जेडने 88 चेंडूंत 87 धावांची दमदार खेळी केली. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या नील पटेलने 71 चेंडूंत 51 धावा करत संघाच्या धावसंख्येत महत्त्वाची भर घातली. 37 षटकांनंतर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 3 बाद 186 अशी मजबूत होती. मात्र, येथून भारतीय गोलंदाजांनी सामन्यात जोरदार पुनरागमन केले.
मोहित उल्वा आणि मनल चौहान यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीला खिंडार पाडले. काव्य पटेल आणि आर्यन सवसानी यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. ऑस्ट्रेलियाचे 2 फलंदाज रनआऊट झाले. त्यामुळे एकेकाळी मजबूत स्थितीत असलेला ऑस्ट्रेलियाचा डाव 254 धावांवर आटोपला.
लक्ष्य रायचंदानीचे शतक, भारताचा सहज विजय
255 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला आर्यवीर सेहवाग आणि कर्णधार लक्ष्य रायचंदानी यांनी आक्रमक सुरुवात करून दिली. आर्यवीरने 31 चेंडूंत 34 धावांची वेगवान खेळी केली. त्यामुळे भारताने पहिल्या पॉवरप्लेमध्येच 66 धावा फटकावल्या. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या व्हीके विनीतला मात्र मोठी खेळी करता आली नाही. त्याने 23 चेंडूंत 10 धावा केल्या.
दरम्यान, कर्णधार लक्ष्य रायचंदानीने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर कुशाग्र ओझाने 45 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. लक्ष्य आणि कुशाग्र यांनी तिसऱ्या विकेटसाठी 85 धावांची मोठी भागीदारी करत भारताचा विजय जवळपास निश्चित केला. यानंतर लक्ष्यने आपला शानदार फॉर्म कायम ठेवत 100 चेंडूंत शतक पूर्ण केले. तो 106 चेंडूंत 110 धावा करून नाबाद राहिला. त्याच्या या विजयी खेळीत 9 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. दुसऱ्या बाजूला रजत बघेलनेही आक्रमक फलंदाजी करत 34 चेंडूंत नाबाद 44 धावा केल्या. त्यामुळे भारतीय संघाने 42 व्या षटकातच 4 विकेट्सच्या मोबदल्यात लक्ष्य गाठत 6 विकेट्सने विजय मिळवला.
