INDW vs AUSW : वनडे सामन्यात दारूण पराभव झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाला शिक्षा, एक चूक नडली
महिला वनडे वर्ल्डकप 2025 स्पर्धेपूर्वीची रंगीत तालीम म्हणून भारत ऑस्ट्रेलिया मालिकेकडे पाहीलं जात आहे. पहिल्या सामन्यात भारताचा दारूण पराभव झाला होता. पण दुसऱ्या सामन्यात भारताने कमबॅक केलं आणि विजय मिळवला. दुसरीकडे, ऑस्ट्रेलिया पराभवासह आणखी एक फटका बसला आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा धुव्वा उडवला होता. दुसऱ्या सामन्यात भारताने फिनिक्स भरारी घेतली आणि हिशेब चुकता केला आहे. ऑस्ट्रेलियाचा 102 धावांनी पराभव करत वचपा काढला. आता तिसरा सामना निर्णायक असणार आहे. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-1 अशी बरोबरी आहे. असं असताना ऑस्ट्रेलिया संघाला पराभवानंतर आणखी एक झटका बसला आहे. आयसीसीने ऑस्ट्रेलिया संघाला दंड ठोठावला आहे. कारण ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या वनडे सामन्यात स्लो ओव्हर रेटचा फटका बसला आहे. ठरवलेल्या वेळेपेक्षा दोन षटकं कमी टाकल्याचं आढळलं. त्यामुळे आयसीसीने सामना फीच्या 10 टक्के दंड ठोठावला आहे. ऑस्ट्रेलियाची कर्णधार एलिसा हीली हीने हा गुन्हा कबूल केला आहे. मैदानावरील पंच वृंदा राठी आणि जननी नारायणन, तिसरे पंच लॉरेन एजेनबाग आणि चौथे पंच गायत्री वेणुगोपालन यांनी ऑस्ट्रेलियन खेळाडूंना दंड ठोठावला.
कसा ठोठावला जातो दंड
आयसीसी नियमानुसार स्लो ओव्हर रेटसाठी संघातील खेळाडूंवर सामना फीवर दंड आकारला जातो. आयसीसी आचारसंहितेच्या कलम 2.22 अंतर्गत, ठरलेल्या वेळेत न टाकलेल्या प्रत्येक षटकासाठी खेळाडूंना त्यांच्या मॅच फीपैकी पाच टक्के दंड आकारला जातो. दोन षटकं उशिरा टाकल्याने ऑस्ट्रेलियावर 10 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाने प्रथम गोलंदाजी करताना 50 षटकात 292 धावा दिल्या. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 8 गोलंदाजांचा वापर केला. यापैकी फक्त दोन गोलंदाजांनी 10 षटकांचा स्पेल पूर्ण केला. तसेच सामन्यात एकूण 15 अतिरिक्त धावा दिल्या. त्यामुळे ओव्हर रेटचं गणित बिघडलं आणि संघाला दंड ठोठावण्यात आला.
🚨 Australia fined 10% of their match fee after the 2nd ODI in New Chandigarh! 🏏#CricketTwitter #INDvsAUS pic.twitter.com/bI3B73h3fb
— Female Cricket (@imfemalecricket) September 19, 2025
भारतीय संघाने विजयासाठी दिलेल्या 292 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघ पत्त्यांच्या बंगल्यासारखा कोसळला. ऑस्ट्रेलियाचा संघ फक्त 41 षटकांचा सामना करू शकला आणि 190 धावांवर बाद झाला. एलिस पेरीने 44 आणि एनाबेल सदरलँडने 45 धावांची खेळी केली. या व्यतिरिक्त एकही फलंदाज साजेशी कामगिरी करू शकला नाही. त्यामुळे या सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं. जर हा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला असता तर मालिका खिशात घातली असती.
