
क्रिकेट चाहत्यांची प्रतिक्षा अवघ्या काही तासांनी संपणार आहे.17 व्या आशिया कप स्पर्धेला (Asia Cup 2025) सुरुवात होण्यासाठी काही तासांचा अवधी बाकी आहे. या आशिया कप स्पर्धेचं आयोजन हे यूएईत करण्यात आलं आहे. आशिया कप स्पर्धेतील सर्व सामने हे दुबई आणि अबुधाबीतील स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहेत. या सर्व सामन्यांना भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत एकूण 8 संघांमध्ये चुरस असणार आहे. 9 ते 28 सप्टेंबर दरम्यान या स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेबाबत सर्वकाही माहिती आपण सविस्तर जाणून घेऊयात.
खरंतर आशिया कप 2025 स्पर्धेच्या यजमानपदाचा मान हा भारताकडे होता. भारत-पाकिस्तान यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीयांच्या भावना तीव्र आहेत. त्यामुळे पाकिस्तान विरुद्धचा सामन्याला भारतात खेळवण्याला तीव्र विरोध होता. तसेच भारतात सामने झाले असते तर टीम इंडियाला पाकिस्तान विरुद्धचे सामने त्रयस्थ ठिकाणी खेळावे लागले असतात. त्यामुळे भारताने यजमानपद कायम ठेवलं. मात्र सर्व सामने हे यूएईतच होणार आहेत.
पहिल्यांदा 1984 साली आशिया कप स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. तेव्हा फक्त 3 संघच या स्पर्धेत होते. भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका या 3 संघांचा समावेश होता.
आशिया कप स्पर्धेच्या इतिहासात भारत सर्वात यशस्वी संघ आहे. भारताने एकूण 8 वेळा आशिया कप ट्रॉफीवर नाव कोरलंय. भारतीय संघ गतविजेता आहे. भारताने 2023 मध्ये रोहित शर्मा याच्या नेतृत्वात वनडे आशिया कप फायनलमध्ये श्रीलंकेवर विजय मिळवला होता. भारतानंतर श्रीलंका या स्पर्धेतील दुसरा यशस्वी संघ आहे. श्रीलंकेने 6 तर पाकिस्तानने 2 वेळा आशिया कप ट्रॉफी उंचावली आहे.
यंदाची आशिया कप स्पर्धेची 17 वी वेळ आहे. आशिया कप स्पर्धेची सुरुवात ही वनडे फॉर्मेटने झाली. मात्र गेल्या काही दशकांमध्ये टी 20i क्रिकेटची क्रेझ वाढली. त्यामुळे 2016 साली पहिल्यांदा टी 20 आशिया कप स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. त्यानंतर 2022 साली पुन्हा टी 20i आशिया कप स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. यंदाची तिसरी वेळ आहे.
आशिया कप स्पर्धेच्या इतिहासात 8 संघ सहभागी होण्याची ही यंदाची पहिलीच वेळ आहे. टीम इंडिया, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या 5 संघांनी थेट प्रवेश मिळवला. तर यूएई, ओमान आणि हाँगकाँग या 3 संघांनी पात्रता फेरीतून आशिया कप स्पर्धेचं तिकीट मिळवलं.
आशिया कप 2023 स्पर्धेत नेपाळ टीमने सहभाग घेतला होता. मात्र यंदा नेपाळ एसीसी प्रीमियर कप स्पर्धेत तिसर्या स्थानासाठी झालेल्या सामन्यात पराभूत झाली. हाँगकाँगने नेपाळला पराभूत करत आशिया कप स्पर्धेचं तिकीट मिळवलं. त्यामुळे नेपाळचं यंदा या स्पर्धेत खेळण्याचं स्वप्न भंगलं.
टीम इंडिया आणि पाकिस्तान दोन्ही संघ एकाच गटात आहेत. त्यामुळे दोन्ही संघ एकदा आमनेसामने येणार, हे निश्चित आहे. हा सामना 14 सप्टेंबरला होणार आहे. त्यानंतर समीकरणं जुळल्यास दोन्ही संघ सुपर 4 आणि अंतिम फेरीतही आमेनसामने येऊ शकतात.