Video : मुस्तफिझुरच्या जाळ्यात विराट कोहली अडकला, अजिंक्यने शेवटच्या क्षणी तसं केलं आणि…

| Updated on: Mar 22, 2024 | 9:24 PM

Chennai Super Kings vs Royal Challengers Banglore IPL 2024 : आयपीएल स्पर्धेतील पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचं पारडं जड दिसलं. नाणेफेकीचा कौल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या बाजूने लागला. पण सामन्यावर पकड चेन्नई सुपर किंग्सने मिळवल्याचं दिसलं. आघाडीच्या फलंदाजांना झटपट बाद करत बॅकफूटवर ढकललं.

Video : मुस्तफिझुरच्या जाळ्यात विराट कोहली अडकला, अजिंक्यने शेवटच्या क्षणी तसं केलं आणि...
Video : विराट कोहलीचा डाव अजिंक्यच्या त्या खेळीने आटोपला, मोक्याच्या क्षणी केलं असं की...
Image Credit source: Twitter
Follow us on

आयपीएल 2024 स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या फलंदाजांनी नांगी टाकल्याचं दिसलं. कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि विराट कोहली यांनी चांगली भागीदारी केली. पहिल्या विकेटसाठी 41 धावांची भागीदारी केली. पण त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा डाव अडखळला. संघाच्या 78 धावा असताना निम्मा संघ तंबूत परतला. फाफ डू प्लेसिस बाद झाल्यानंतर रजत पाटीदार आणि ग्लेन मॅक्सवेल यांना खातंही खोलता आलं नाही. त्यानंतर विराट कोहलीच्या खांद्यावर संघाची जबाबदारी आली होती. विराट कोहलीने सामना आणि स्पर्धेतील पहिला षटकार ठोकत आपला आक्रमक अंदाजही दाखवला. पण त्याची ही खेळी जास्त काळ टिकली नाही. 20 चेंडूत 21 धावा करून तंबूत परतला. अजिंक्य रहाणेच्या मेहनतीने रचिन रविंद्रने शेवटच्या क्षणी केलेल्या मदतीने विराट कोहलीला तंबूत पाठवलं.

कर्णधार ऋतुराज गायकवाडने संघाचं 12वं षटक मुस्तफिझुर रहमानला सोपवलं. पहिल्या चेंडूवर एक धाव आली आणि विराट कोहलीला स्ट्राईक मिळाली. दुसऱ्या चेंडूवर विराट कोहलीने मिड ऑनच्या दिशेने आडवा पट्टा मारला. पण रहाणेनं शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर नजर ठेवली आणि मिड विकेटच्या दिशेने धाव घेतली. राईट हातात स्लाईट मारत झेल पकडला. पण सीमारेषेवर आदळणार इतक्यात धावत आलेल्या रचिन रविंद्रकडे चेंडू फेकला आणि त्याने झेल घेतला. या झेलचं क्रेडीट रचिन रवींद्रला मिळालं. पण खऱ्या अर्थाने यासाठी अजिंक्य रहाणेनं मेहनत घेतली होती.

विराट कोहली बाद होताच अनुज रावत मैदानात उतरला. त्याने एक धाव घेत कॅमरोन ग्रीनला स्ट्राईक दिली. मात्र आजचा दिवस मुस्तफिझुर रहमानचा आहे हे सांगायला नको. चौथ्या चेंडूवर कॅमरोन ग्रीनला क्लिन बोल्ड केलं. त्यामुळे आरसीबीचं मोठी धावसंख्या उभारण्याचं स्वप्न भंगलं असंच म्हणावं लागेल. दुसरीकडे, विराट कोहलीने टी20 क्रिकेटमध्ये 12 हजार धावा पूर्ण केल्या.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, एमएस धोनी (विकेटकीपर), दीपक चहर, महेश थेक्षाना, मुस्तफिजुर रहमान, तुषार देशपांडे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अनुज रावत, कर्ण शर्मा, अल्झारी जोसेफ, मयंक डागर, मोहम्मद सिराज.