
आयपीएल 2024 स्पर्धेच्या 60व्या सामन्यात पावसाने हजेरी लावल्याने खेळ सुरु होण्यास उशीर झाला. हा सामना उशिराने सुरु झाल्याने षटकं कमी करण्यात आली. 16 षटकांच्या खेळात फलंदाजीसाठी आलेल्या कोलकाता नाईट रायडर्सने 7 गडी गमवून 157 धावा केल्या. तसेच विजयासाठी 158 धावांचं आव्हान दिलं आहे. आता मुंबई इंडियन्सला 96 चेंडूत हे आव्हान पूर्ण करायचं आहे. मागच्या सामन्यात मुंबईला 20 षटकात 170 धावा झाल्या नव्हत्या. कोलकात्याने 24 धावांनी मुंबईला पराभूत केलं होतं. आता पुन्हा एकदा कोलकाता मुंबईला रोखण्यात यशस्वी ठरणार का? हा प्रश्न अधोरेखित होत आहे. कोलकात्याने आजचा सामना जिंकला प्लेऑफमध्ये अधिकृतपणे पात्र होणारा पहिला संघ ठरणार आहे. अन्यथा पात्र होण्याचं गणित आणखी लांबणार आहे.
कोलकात्याकडून फिल सॉल्ट आणि सुनील नरीन ही जोडी मैदानात उतरली होती. मात्र हवी तशी कामगिरी करू शकले नाही. फिलिप सॉल्ट फक्त 6 धावा करून तंबूत परतला. तर सुनील नरीनला आपलं खातंही खोलता आलं नाही. त्यानंतर श्रेयस अय्यरही काही खास करू शकला नाही. फक्त 7 धावा करून तंबूत परतला. पण वेंकटेश अय्यरने डाव सावरला. चौथ्या गड्यासाठी त्याने 37 धावांची भागीदारी केली. तसेच वैयक्तिक 42 धावा करून तंबूत परतला. त्यानंतर नितीश राणा आणि आंद्रे रसेलने धावांसाठी जोरदार फटकेबाजी केली. नितीश राणा धावचीत होत तंबूत परतला. तर आंद्रे रसेलचा फटका चुकला आणि झेल बाद झाला. रिंकू सिंहने फटकेबाजी केली. 12 चेंडूत 20 धावा करून बुमराहच्या गोलंदाजीवर बाद झाला.
मुंबई इंडियन्सकडून हार्दिक पांड्या वगळता सर्व गोलंदाजांना विकेट घेण्यात यश आलं. जसप्रीत बुमराह आणि पियुष चावला यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. जसप्रीत बुमराहने 4 षटकात 39 धावा देत 2 गडी बाद केले. तर पियुष चावलाने 3 षटकात 28 धावा देत 3 गडी टिपले. तर नुवान तुषारा आणि अनशुल कंबोजने प्रत्येकी एक गडी बाद केला.
मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन) : इशान किशन (विकेटकीपर), नमन धीर, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, नेहल वढेरा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, अंशुल कंबोज, पीयूष चावला, जसप्रीत बुमराह, नुवान तुषारा.
कोलकाता नाइट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंग, नितीश राणा, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.