GT vs CSK IPL 2025 : कॅप्टन धोनी रविवारी खेळणार अखेरचा सामना, गुजरात विरुद्ध भिडणार
CSK Captain Mahendra Singh Dhoni Ipl 2025 : चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याला ऋतुराज गायकवाड याला झालेल्या दुखापतीनंतर उर्वरित सामन्यांमध्ये काही खास करता आलं नाही. धोनीच्या नेतृत्वात सीएसके रविवारी 18 व्या हंगामात शेवटचा सामना खेळणार आहे.

आयपीएलच्या 18 व्या मोसमात प्लेऑफसाठी 4 संघ निश्चित झाले आहेत. आता टॉप 2 साठी जोरदार चुरस पाहायला मिळत आहेत. या हंगामात साखळी फेरीतील मोजून काहीच सामने बाकी आहेत. साखळी फेरीतील सामन्यानंतर प्लेऑफच्या शर्यतीतील पहिले 2 संघ निश्चित होतील. या हंगामातील शेवटचा डबल हेडर रविवारी 25 मे रोजी खेळवण्यात येणार आहे. या डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स आमेनसामने असणार आहेत. शुबमन गिल गुजरातचं नेतृत्व करणार आहे. तर महेंद्रसिंह धोनी याच्याकडे चेन्नईच्या कर्णधारपदाची धुरा असणार आहे.
गुजरात आणि चेन्नई या दोन्ही संघांचा हा या साखळी फेरीतील 14 वा आणि शेवटचा सामना असणार आहे. गुजरातने प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. तर चेन्नई स्पर्धेतून बाहेर झाली आहे. चेन्नईने 13 पैकी फक्त 3 सामने जिंकले आहेत. त्यामुळे चेन्नईचा जाता जाता विजयाने शेवट करण्याचा प्रयत्न असणार आहे. तर गुजरातचा शेवटचा सामना जिंकून पॉइंट्स टेबलमध्ये टॉप 2 मध्ये कायम राहण्याचा प्रयत्न असणार आहे. गुजरातने 13 पैकी 9 सामने जिंकले आहेत. गुजरात 18 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी आहे. तर चेन्नई 6 गुणांसह सर्वात शेवटी अर्थात दहाव्या क्रमांकावर आहे.
कर्णधार धोनीचा अखेरचा सामना
महेंद्रसिंह धोनी याचा हा कर्णधार म्हणून शेवटचा सामना असणार आहे. धोनी चेन्नईचा सर्वात यशस्वी कर्णधार राहिला आहे. धोनीने सीएसकेला त्याच्या नेतृत्वात 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकून दिली आहे. मात्र धोनीने आयपीएलच्या 17 व्या मोसमाआधी (IPL 2024) युवा ऋतुराज गायकवाड याला कर्णधारपदाची सूत्र सोपवली होती. मात्र ऋतुराजला 18 व्या मोसमादरम्यान दुखापत झाली. त्यामुळे ऋतुराजला या संपूर्ण हंगामातून बाहेर व्हावं लागलं. त्यामुळे धोनीला उर्वरित सामन्यांसाठी नेतृत्व देण्यात आलं.
धोनी चेन्नईचा नियमित कर्णधार राहिलेला नाही. धोनीला ऋतुराजच्या दुखापतीमुळे उर्वरित सामन्यांसाठी नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली. मात्र आता 2026 मध्ये ऋतुराज पुन्हा नेतृत्व करणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे धोनीचा 25 मे रोजी कर्णधार म्हणून शेवटचा सामना असणार, हे निश्चित आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
दरम्यान धोनी खेळाडू म्हणून आयपीएलमधून निवृत्त होऊ नये, अशी इच्छा प्रत्येक थाला फॅनची आहे. मात्र धोनी या स्पर्धेतून केव्हा निवृत्त होईल सांगता येत नाही. धोनीने याआधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे धोनीने त्याच्या निवृत्तीचा पॅटर्न ही सेट केलाय.अशात धोनी 2026 मध्ये खेळणार की नाही? हे अजून स्पष्ट नाही. मात्र धोनीचा रविवारी 25 मे रोजीचा 18 व्या मोसमात कर्णधार म्हणून शेवटचा सामना असणार, हे स्पष्ट आहे.