
आयपीएल 2025 स्पर्धेच्या प्लेऑफ सामन्यांना सुरुवात झाली आहे. 29 मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्स हे संघ क्वॉलिफायर 1 फेरीत आमनेसामने येतील. या सामन्यातील विजयी संघ थेट अंतिम फेरी गाठणार आहे. तर पराभूत संघाला अंतिम फेरीसाठी आणखी एक संधी मिळणार आहे. दुसरीकडे, एलिमिनेटर सामना गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. हा सामना 30 मे रोजी होणार आहे. मोहालीतील मुल्लांपूर क्रिकेट स्टेडियमममध्ये हे दोन्ही संघ आमनेसामने येतील. या सामन्यात पराभूत झालेल्या संघाला स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागेल. तर विजयी संघ क्वॉलिफायर 2 फेरीत खेळेल. पण एलिमिनेटर सामन्यात पाऊस पडला आणि सामना रद्द करण्याची वेळ आली तर कोणत्या संघ बाहेर जाईल. असा प्रश्न अनेकांना पडला आहे. कारण साखळी फेरीत प्रत्येकी एक गुण देऊन विषय संपत होता. मात्र आता तसं होणार नाही. अशा स्थितीत काय होतं? जाणून घ्या बीसीसीआयचा नियम
आयपीएल 2025 स्पर्धेत एलिमिनेटर सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात होत आहे. गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर असलेल्या गुजरात टायटन्स आणि चौथ्या स्थानावर असलेल्या मुंबई इंडियन्स यांच्यात हा सामना होत आहे. या सामन्यातील विजयी संघ पुढच्या फेरीत म्हणजेच क्वॉलिफायर 2 मध्ये खेळेल. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना करो या मरोची लढाई आहे. पण या सामन्यासाठी बीसीसीआयने राखीव दिवस ठेवलेला नाही. म्हणून हा सामना काही कारणास्तव रद्द झाला तर पुढच्या सामन्याचं तिकीट कोणाला मिळेल? आणि कोणता संघ बाहेर जाईल? जाणून घ्या.
साखळी फेरीत गुजरात टायटन्सने 18 गुणांसह गुणतालिकेत तिसरं स्थान गाठलं आहे. तर मुंबई इंडियन्स 16 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. त्यामुळे हा सामना पावसामुळे रद्द झाला तर गुजरात टायटन्सला पुढच्या फेरीचं तिकीट मिळेल. तर मुंबई इंडियन्सला गाशा गुंडाळावा लागेल. क्वॉलिफायर 1 आणि एलिमिनेटर सामन्यासाठी राखीव दिवस नसल्याने हा नियम असणार आहे. पण क्वॉलिफायर 2 आणि अंतिम फेरीसाठी राखीव दिवस आहे. नियोजित दिवशी सामना पूर्ण झाला नाही तर पुढच्या दिवशी खेळवला जाईल. राखीव दिवशी सामना जिथे थांबला तेथूनच सुरुवात होईल.