RCB vs KKR : बंगळुरु विरुद्ध कोलकाता सामना रद्द झाल्यास कुणाला तोटा? जाणून घ्या

RCB vs KKR M Chinnaswamy Stadium weather IPL 2025 : भारत-पाकिस्तान यांच्यातील संघर्ष संपल्यानंतर 17 मे पासून आयपीएलच्या 18 व्या मोसमातील दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होत आहे. मात्र आरसीबी विरुद्ध केकेआर या सामन्यावर पावसाचं सावट आहे. त्यामुळे हा सामना रद्द होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

RCB vs KKR : बंगळुरु विरुद्ध कोलकाता सामना रद्द झाल्यास कुणाला तोटा? जाणून घ्या
M Chinnaswamy Stadium Bengaluru Rain
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 17, 2025 | 5:37 PM

आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 58 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने असणार आहेत. हा सामना आज17 मे रोजी बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. मात्र या सामन्याआधी क्रिकेट चाहत्यांसाठी वाईट बातमी समोर आली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, या सामन्यात पावसामुळे व्यत्यय येण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे हा सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होणार? कोणता संघाला सर्वाधिक फायदा होणार? याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.

भारत-पाकिस्तान यांच्यातील स्थिती नियंत्रणात आल्यानंतर आता एका आठवड्याच्या स्थगितीनंतर पुन्हा एकदा 17 मे पासून आयपीएलच्या 18 व्या हंगामातील दुसऱ्या टप्प्याला (IPL 2025) सुरुवात होत आहे. इथून पुढील प्रत्येक सामना हा प्लेऑफच्या हिशोबाने निर्णायक आहे. त्यामुळे बंगळुरु विरुद्ध कोलकाता सामना रद्द झाल्यास कोणत्या संघाला ते नुकसानकारक ठरेल? हे जाणून घेऊयात.

आरसीबीला फायदा

केकेआर विरुद्ध आरसीबी सामना पावसामुळे रद्द झाला तर बंगळुरुला फायदा होईल. सामना रद्द होताच आरसीबीचं प्लेऑफमधील स्थान जवळपास निश्चित होईल. आरसीबीच्या खात्यात सध्या 11 सामन्यांमधील 8 विजयांसह 16 गुण आहेत. सामना रद्द झाल्यानंतर आरसीबीला 1 गुण मिळेल. आरसीबीच्या खात्यात अशाप्रकारे 17 पॉइंट्स होतील.

केकेआरचा पत्ता कट

सामना रद्द झाल्याने केकेआरचं प्लेऑफमधील आव्हान संपुष्ठात येऊ शकतं. केकेआरने 12 पैकी 5 सामने जिंकले आहेत. केकेआरला 6 वेळा पराभूत व्हावं लागलंय. तर 1 सामना हा पावसामुळे रद्द झालाय. त्यामुळे केकेआरच्या खात्यात 11 गुण आहेत. सामना रद्द झाल्यास केकेआरचे 13 सामन्यांनंतर 12 पॉइंट्स होतील. त्यामुळे केकेआरने उर्वरित 1 सामना जिंकला तरीही त्यांचे 14 गुण होतील. त्यामुळे केकेआरसाठी आरसीबी विरुद्धचा हा सामना करो या मरो असा आहे.

आरसीबी केकेआर विरूद्धच्या सामन्यानंतर सनरायजर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध भिडणार आहे. केकेआर विरुद्धचा सामना रद्द झाला आणि उर्वरित 2 सामने जिंकले तर आरसीबीच्या खात्यात एकूण 21 पॉइंट्स होतील. तर दुसऱ्या बाजूला गुजरातने उर्वरित तिन्ही सामने जिंकले तर त्यांचे एकूण 22 गुण होतील. गुजरात यासह पहिल्या स्थानी पोहचेल. त्यामुळे दुसऱ्या स्थानी कोण राहणार हे नेट रनरेटच्या आधारे ठरेल. त्यामुळे आरसीबीचा नेट रनरेट सुधारण्याचा प्रयत्न असणार आहे.