IPL 2026 GT vs RR: राजस्थान रॉयल्सचा प्रवास क्वॉलिफायर 2 मध्ये थांबला, कर्णधार रियान पराग म्हणाला की…

आयपीएल 2026 स्पर्धेच्या क्वॉलिफायर 2 सामन्यात गुजरात टायटन्सने बाजी मारली. यासह अंतिम फेरीत पोहोचणारा दुसरा संघ ठरला आहे. आता अंतिम फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी सामना होणार आहे. पराभवानंतर राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार रियान परागने आपलं मत व्यक्त केलं.

IPL 2026 GT vs RR: राजस्थान रॉयल्सचा प्रवास क्वॉलिफायर 2 मध्ये थांबला, कर्णधार रियान पराग म्हणाला की...
IPL 2026 GT vs RR: राजस्थान रॉयल्सचा प्रवास क्वॉलिफायर 2 मध्ये थांबला, कर्णधार रियान पराग म्हणाला की...
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 29, 2026 | 11:35 PM

आयपीएल 2026 स्पर्धेच्या क्वॉलिफायर 2 फेरीनंतर राजस्थान रॉयल्स संघाचा प्रवास थांबला आहे. राजस्थान रॉयल्सचं अंतिम फेरी गाठण्याचं स्वप्न भंगलं आहे. जस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करून 20 षटकात 8 गडी गमवून 214 धावा केल्या होत्या. तसेच विजयासाठी 215 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. हे लक्ष्य गाठताना शुबमन गिल आणि साई सुदर्शन यांनी चांगली सुरूवात केली. त्यामुळे राजस्थान रॉयल्सचे गोलंदाज पुरते हतबल दिसले. गुजरात टायटन्सने 167 धावांवर पहिली विकेट गमावली. ही विकेट देखील नशिबाने मिळाली असंच म्हणावं लागेल. साई सुदर्शनने ब्रिजेश शर्माच्या गोलंदाजीवर चौकार मारला. पण बॅट हातातून सटकली आणि स्टंपवर आदळली. त्यामुळे पहिला धक्का बसला. पण तिथपर्यंत राजस्थान रॉयल्सच्या हातून सामना गेला होता. गोलंदाज विकेट घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होते. दुसरीकडे चौकार षटकार मारून गुजरात विजयाच्या वेशीवर पोहोचत होती. अखेर निकाल गुजरातच्या बाजूने लागला.

काय म्हणाला रियान पराग?

आयपीएल 2026 स्पर्धेतील क्वॉलिफायर स्पर्धेत पराभव झाल्यानंतर राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग म्हणाला की, ‘ही एक सरासरी धावसंख्या होती. ती बचावण्यासारखी होती. मला वाटले की दुसऱ्या डावात खेळपट्टी सुधारली. पहिल्या डावात गोलंदाजांना चेंडूवर चांगली पकड मिळाली आणि स्लोअर बॉल्सनी चांगली कामगिरी केली. मला वाटले की 230 ही एक सरासरी धावसंख्या ठरली असती. 240 च्या आसपासची धावसंख्या आव्हानात्मक ठरली असती, पण आम्हाला सलामीवीरांची लवकर गरज होती. तसे झाले नाही, ज्यामुळे आमच्यासाठी परिस्थिती कठीण झाली. या हंगामाबाबत एका वाक्यात सांगायचे झाल्यास, अनेक सकारात्मक गोष्टी होत्या. अनेक खेळाडू तरुण आणि अननुभवी असल्यामुळे आम्ही पात्र ठरू असे वाटत नव्हते, पण अनेक तरुण खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आणि येथून पुढे ते नक्कीच सुधारणा करू शकतात. ‘

एलिमिनेटर खेळलेल्या तीनच संघांना अंतिम फेरी गाठता आली

एलिमिनेटर फेरी खेळून अंतिम फेरी गाठण्यात तीन संघांना यश आलं होतं. यात 2012 मध्ये चेन्नई सुपर किंग्स, 2016 मध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि 2021 कोलकाता नाईट रायडर्सने अंतिम फेरी गाठली होती. यात फक्त 2016 मध्ये सनरायझर्स हैदराबादने जेतेपद मिळवलं होतं. यंदा ही किमया राजस्थान रॉयल्स करू शकते असं वाटलं होतं. पण तसं काही झालं नाही. गुजरात टायटन्सने अंतिम फेरीत धडक मारली आहे. आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम फेरीसाठी लढत होणार आहे. गुजरात टायटन्सने तिसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. एकदा जेतेपद मिळवलं आहे. तर एकदा पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. क्वॉलिफायर 2 जिंकून
अंतिम फेरी गाठलेल्या फक्त एकाच संघाला दोनदा जेतेपद मिळवता आलं आहे. मुंबई इंडियन्सने ही कामगिरी केली आहे. आता गुजरात टायटन्स ही कामगिरी करते का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेलं.

Follow Us