IPL 2026: शुबमन गिल किती सामन्यांना मुकणार? गुजरात टायटन्सकडून अपडेट येताच धाकधूक वाढली
आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी आणि स्पर्धा सुरू असताना अनेक फ्रेंचायझींना खेळाडूंच्या दुखापतीमुळे धक्का बसला आहे. काही खेळाडू अजूनही फिट झालेले नाहीत. असं असताना गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिलही दुखापतग्रस्त आहे. त्यामुळे पुढच्या सामन्यात खेळणार की नाही असा प्रश्न आहे.

आयपीएल 2026 स्पर्धेत गुजरात टायटन्सची स्थिती नाजूक असल्याचं दिसत आहे. स्पर्धेतील सुरूवात काही चांगली झाली नाही. सलग दोन सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. त्यामुळे आता विजयी ट्रॅकवर परतण्याचं आव्हान आहे. असं असताना गुजरात टायटन्सला शुबमन गिलच्या रूपाने मोठा धक्का बसला आहे. पहिल्या सामन्यात शुबमन गिल खेळला. पण दुसऱ्या सामन्यात दुखापतीमुळे खेळू शकला नाही. त्यामुळे कर्णधारपदाची धुरा राशीद खानच्या खांद्यावर आली होती. त्यामुळे पुढच्या सामन्यात खेळणार की नाही याची धाकधूक क्रीडाप्रेमींना लागून आहे. कारण शुबमन गिलकडे नेतृत्व नसेल तर संघाची स्थिती खूपच खालावलेली दिसत आहे. अशा स्थितीत पुढच्या सामन्यात जर कमबॅक केलं नाही तर कठीण होईल. याबाबत गुजरात टायटन्सकडून एक मोठी अपडेट समोर आली आहे. गिलच्या दुखापतीबाबत गुजरात टायटन्सचे असिस्टंट कोच पार्थिव पटेलने अपडेट दिली आहे.
काय म्हणाला पार्थिव पटेल?
आयपीएल स्पर्धेतील गुजरात टायटन्सचा पुढचा सामना 8 एप्रिलला होणार आहे. हा सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणार आहे. या सामन्यासाठी शुबमन गिल फिट असेल का? असा प्रश्न अनेकजण विचारत आहेत. त्यावर पार्थिव पटेल यांनी अपडेट देत मैदानात लवकरच परतेल अशी आशा व्यक्त केली आहे. पार्थिव पटेलने सांगितलं की, शुबमन गिलला मागच्या दोन दिवसांपासून मसल स्पाज्म आहे. आशा आहे की पुढच्या सामन्यात खेळण्यासाठी तो सज्ज असेल. त्याची दुखापत फार काही गंभीर नाही. पार्थिव पटेलने स्पष्टीकरण दिलं खरं, पण एक गोष्ट स्पष्ट केली. शुबमन गिलच्या दुखापतीवर भाष्य करताना सांगितलं की, दुखापतीची तीव्रता ठरवणे हे माझं काम नाही, पण विश्वास आहे की गिल ठीक आहे.
शुबमन गिल आता पुढच्या सामन्यात खेळेल की नाही याबाबत ठोस उत्तर कोणाकडेच नाही. त्यामुळे पुढच्या सामन्यात खेळण्याबाबतही साशंकता आहे. मागच्या 18 महिन्यात शुबमन गिल दुखापतग्रस्त होण्याची ही चौथी वेळ आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये मानेच्या दुखापतीमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यातूनच बाहेर पडला. त्यानंतर नोव्हेंबर 2024 मध्ये डाव्या अंगठ्याच्या दुखापतीमुळे बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या कसोटीतून बाहेर पडला. तर नोव्हेंबर 2025 पुन्हा मानेची दुखापत झाली आणि दक्षिण अफ्रिकेविरुद्धची कसोटी खेळला नाही. आता मसल स्पाज्ममुळे राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळू शकला नाही.