
आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर अवघ्या 3 दिवसांनी 11 मार्च रोजी आयपीएलच्या आगामी 19 व्या मोसमाचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं. विविध राज्यातील विधानसभा निवडणुकीमुळे पहिल्या 16 दिवसांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. त्यानुसार 28 मार्चपासून स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या पहिल्या टप्प्यात एकूण 16 दिवसांत 4 डबल हेडरसह एकूण 20 सामने खेळवण्यात येणार आहेत. त्यानंतर आता स्पर्धेतील 10 संघ आणखी सक्रीय झाले आहेत. सर्व संघांनी तयारीला सुरुवात केली आहे.
या मोसमातील सलामीच्या सामन्यात गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसमोर 28 मार्च रोजी सनरायजर्स हैदराबादचं आव्हान असणार आहे. मात्र या सलामीच्या सामन्याआधी दोन्ही संघांचं टेन्शन वाढलं आहे. या सलामीच्या सामन्यात दोन्ही संघातील प्रत्येकी 1-1 खेळाडूचं खेळणं अनिश्चित समजलं जात आहे. ऑस्ट्रेलियाची अनुभवी जोडी पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूड या दोघांच्या क्रिकेट बोर्डाकडून अद्यापही आयपीएल स्पर्धेत खेळण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र (Noc) मिळालेलं नाही. आयपीएल स्पर्धेत खेळण्यासाठी प्रत्येक खेळाडूला आपल्या देशाच्या क्रिकेट बोर्डाची परवानगी आवश्यक असते.
जोश हेझलवूड आयपीएल स्पर्धेत आरसीबीचं प्रतिनिधित्व करतो. तर पॅट कमिन्स याच्याकडे हैदराबादच्या नेतृत्वाची धुरा आहे. हे दोघेही गेल्या अनेक महिन्यांपासून दुखापतीसोबत लढा देत आहे. या दोघांना दुखापतीमुळे टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेलाही मुकावं लागलं. मात्र त्यानंतरही दोघेही फिट झालेले नाहीत. त्यामुळे या दोघांना आयपीएलच्या 19 व्या पर्वात खेळण्यासाठी परवानगी मिळालेली नाही. या दोघांना दुखापतीमुळे या मोसमातील सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकावं लागू शकतं. सध्या या दोघांवर वैद्यकीय पथक लक्ष ठेवून आहे. दोघांनाही सर्व औपचारिकता पूर्ण केल्यावरच आयपीएल स्पर्धेत खेळता येईल.
पॅट आणि हेझलवूड या दोघांना गेल्या अनेक महिन्यांपासून दुखापतीसोबत संघर्ष सुरु आहे. पॅटला जुलै 2025 साली वेस्ट इंडिज विरूद्धच्या मालिकेपासून पाठदुखीचा त्रास सुरु आहे जो अजूनही कायम आहे. त्यामुळे पॅटला बहुतांश स्पर्धेला आणि मालिकांना मुकावं लागलं आहे. तसेच जोश हेझलवूड नोव्हेंबर 2025 मध्ये झालेल्या हॅमस्ट्रिंगमुळे अजूनही मैदानातून बाहेर आहे.
दरम्यान पॅट आणि जोश या दोघांनी आयपीएलमध्ये आपल्या बॉलिंगच्या जोरावर आपली छाप सोडली आहे. पॅटने आयपीएलमधील 72 सामन्यांमध्ये 79 विकेट्स मिळवल्या आहेत. तर हेझलवूड याने 39 सामन्यांमध्ये 57 विकेट्स घेण्यात यश मिळवलं आहे. जोशने गेल्या मोसमात आरसीबीला चॅम्पियन करण्यात प्रमुख योगदान दिलं होतं. मात्र आता पॅट आणि जोश हे दोघे कधीपर्यंत फिट होतात आणि त्यांना क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून एनओसी दिली जाते? याकडे एसआरएच आणि आरसीबी टीम मॅनेजमेंटचं लक्ष असणार आहे.