IPL 2026, RCB vs LSG: आरसीबी विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स, आकडेवारीत कोण पुढे? जाणून घ्या

आयपीएल 2026 स्पर्धेतील 23वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात होणार आहे. या सामन्यात दोन्ही संघ तूल्यबल आहेत. पण आतापर्यंत दोन्ही संघांची एकमेकांविरुद्ध कशी कामगिरी आहे? जाणून घेऊयात.

IPL 2026, RCB vs LSG: आरसीबी विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स, आकडेवारीत कोण पुढे? जाणून घ्या
IPL 2026, RCB vs LSG: आरसीबी विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स, आकडेवारीत कोण पुढे? जाणून घ्या
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 14, 2026 | 8:31 PM

आयपीएल 2026 स्पर्धेतील 23व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनौ सुपर जायंट्स हे संघ भिडणार आहे. रजत पाटीदारच्या नेतृत्वात आरसीबीने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. आतापर्यंत खेळलेल्या 4 पैकी तीन सामन्यात विजय मिळवला आहे. तर राजस्थान रॉयल्सविरुद्धचा सामना गमावला आहे. दुसरीकडे, लखनौ सुपर जायंट्सने सुरुवातीचे दोन सामने गमावले होते. त्यानंतर दोन सामन्यात विजय मिळवून विजयी ट्रॅकवर परतले आहे. आरसीबी संघ 6 गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी, तर लखनौचा संघ 4 गुणांसह सातव्या स्थानावर आहे. त्यामुळे दोन्ही संघांची कामगिरी चांगली आहे. आता या सामन्यात कोण बाजी मारतो याची उत्सुकता आहे. हा सामना आरसीबीचं होमग्राउंड असलेल्या एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये होणार आहे.

स्पर्धेच्या इतिहासात कोणाचं पारडं जड?

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात दोन्ही संघ सहा वेळा आमनेसामने आले आहेत. यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा वरचष्मा दिसून आला आहे. आरसीबीने सहा पैकी 4 सामन्यात विजय मिळवला आहे. तर लखनौ सुपर जायंट्सने दोन सामन्यात विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये दोन सामने खेळले गेले आणि दोन्ही सामन्यात लखनौने बाजी मारली आहे. त्यामुळे हा सामना आरसीबीच्या होमग्राउंडवर जरी असला तरी टेन्शन आहे. कारण या मैदानात लखनौविरुद्धची कामगिरी निराशाजनक आहे. दुसरीकडे, यंदाच्या पर्वात बंगळूरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर दोन सामने खेळले गेले. या दोन सामन्यांच्या चारही डावांमध्ये 200पेक्षा जास्त धावा झाल्या आहेत. आरसीबीने एकदा पाठलाग करून सामना जिंकला. तर एकदा 250 धावा रोखल्या आहेत.

जमेची आणि कमकुवत बाजू

आरसीबीच्या संघात सध्या सर्वच खेळाडू फॉर्मात आहे असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. फलंदाजी आणि गोलंदाजीत या संघाने चांगली कामगिरी केली आहे. जेकब डफी आणि भुवनेश्वर कुमार यांची पॉवरप्लेमधील जबरदस्त कामगिरी आहे. फिरकी गोलंदाज कृणाल पांड्या आणि सुयश शर्मा यांनी धावा रोखल्या आहेत. लखनौकडून मुकुल चौधरी आणि आयुष बडोनी यांनी फिनिशरची भूमिका बजावली आहे. पण पंत आणि पूरनचा फॉर्म चिंतेचा विषय आहे. गोलंदाजीत मोहम्मद शमी अचूक टप्प्याची गोलंदाजी करत आहे. त्यामुळे हा सामना या खेळाडूंच्या आवतीभोवती फिरेल.

Follow Us