RR vs DC: मी घाबरलो होतो…! वैभव सूर्यवंशीला बाद केल्यानंतर काईल जेमिसनची सामन्यानंतर जाहीर कबुली

आयपीएल 2026 स्पर्धेतील 43व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सला 7 गडी राखून मात दिली. या सामन्यात वैभव सूर्यवंशीची बॅट काही चालली नाही. पण त्याची दहशत मात्र होती. याची कबुली काईल जेमिसनने दिली आहे.

RR vs DC: मी घाबरलो होतो...! वैभव सूर्यवंशीला बाद केल्यानंतर काईल जेमिसनची सामन्यानंतर जाहीर कबुली
RR vs DC: मी घाबरलो होतो...! वैभव सूर्यवंशीला बाद केल्यानंतर काईल जेमिसनची सामन्यानंतर जाहीर कबुली
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 02, 2026 | 5:09 PM

आयपीएल 2026 स्पर्धेतील 43व्या सामन्यात राजस्थान रॉयलन्सने विजयासाठी दिलेल्या 226 धावांचा पाठलाग दिल्ली कॅपिटल्सने यशस्वीरित्या केला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी घेतली होती. त्यामुळे वैभव सूर्यवंशीची आक्रमक फलंदाजी पाहायला मिळेल असं वाटलं होतं. पण तसं झालं नाही. अवघ्या 4 धावा करून बाद झाला. काईल जेमिसनने त्याला तंबूचा रस्ता दाखवला. या विकेटनंतर काईल जेमिसनने आक्रमक सेलीब्रेशन केलं. त्याचं वागणं पाहून क्रीडाप्रेमींना आश्चर्याचा धक्का बसला. 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीला बाद केल्यानंतर इतकं आक्रमक सेलीब्रेशन करण्याचं कारण काय? असा प्रश्नही क्रीडाप्रेमींनी विचारला. 6 फूट 8 इंच उंचीचा जेमिसनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा यांसारख्या दिग्गजांना अडचणीत आणले आहे. त्यात वैभव सूर्यवंशीला दुसऱ्याच चेंडूवर तंबूचा रस्ता दाखवला होता. सामन्यानंतर काईल जेमिसनने याबाबत आपलं मत मांडलं.

आयपीएल स्पर्धेतील या सामन्यानंतर काईल जेमिसन म्हणाला, “मला नाही वाटत की मी माझ्या आयुष्यात कधी एखाद्या 15 वर्षांच्या मुलाला इतका घाबरलो असेन. पण सामन्यापूर्वी वैभवविरुद्ध आमची एक योजना होती, आणि ती यशस्वी झालेली पाहून आनंद झाला.” जेमिसनच्या वक्तव्याने आता सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. वैभव सूर्यवंशीची फलंदाजीची शैली आणि गोलंदाजांवर दबाव टाकण्याच्या रणनितीमुळे घाबरलो होतो, अशी जाहीर कबुली जेमिसनने दिली. “आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळूनही, मला एका 15 वर्षांच्या मुलाला गोलंदाजी करायला भीती वाटते. माझ्या आयुष्यात मला एखाद्या मुलाची इतकी भीती कधीच वाटली नाही.”

वैभव सूर्यवंशी आणि काईल जेमिसन यांचा पुन्हा एकदा सामना होणार आहे. यापूर्वी सनरायझर्स हैदराबादचा प्रफुल हिंगे आणि त्याचा आमनासामना झाला होता. तेव्हा त्याला पहिल्याच चेंडूवर त्याने बाद केलं होतं. तेव्हा हिंगेने पहिल्याच चेंडूवर बाद करेन असं संघ सहकाऱ्यांना सांगितलं होतं, असं विधान केलं. त्यानंतर दोघांचा पुन्हा आमनासामना झाला आणि वैभवने त्याला चार चेंडूत चार षटकार मारून हिशेब चुकता केला. आता काईल जेमिसनची पाळी येणार आहे. 17 मे रोजी पुन्हा एकदा राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना होणार आहे. त्यामुळे या सामन्याची उत्सुकता आतापासूनच लागली आहे.

Follow Us