RR vs SRH : इशानच्या खेळीसमोर वैभवचं शतक व्यर्थ, हैदराबादचा सलग चौथा विजय, राजस्थानचा 5 विकेट्सने धुव्वा

Rajasthan Royals vs Sunrisers Hyderabad Match Result, IPL 2026 : वैभव सूर्यवंशी याचं शतक आणि ध्रुुव जुरेलच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने सनरायजर्स हैदराबादला 229 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र इशान किशन याने झंझावाती खेळी करत हैदराबादला विजयी करण्यात बॅटिंगने सर्वाधिक योगदान दिलं.

RR vs SRH : इशानच्या खेळीसमोर वैभवचं शतक व्यर्थ, हैदराबादचा सलग चौथा विजय, राजस्थानचा 5 विकेट्सने धुव्वा
Vaibhav Sooryavanshi Ishan Kishan and Abhishek Sharma
Image Credit source: PTI and Bcci
| Updated on: Apr 26, 2026 | 3:03 AM

सनरायजर्स हैदराबादने आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात शनिवारी 25 एप्रिलला डबल हेडरमधील दुसऱ्या आणि एकूण 36 व्या सामन्यात होम टीम राजस्थान रॉयल्सवर 5 विकेट्सने विजय मिळवला आहे. वैभव सूर्यवंशी याने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने सनरायजर्स हैदराबादसमोर 229 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र इशान किशन याची चाबूक खेळी वैभवच्या शतकापेक्षा सरस ठरली. इशानने केलेल्या खेळीच्या जोरावर हैदराबादने विजयी आव्हान 5 विकेट्स राखून 9 बॉलआधी पूर्ण केलं. हैदराबादने 18.3 ओव्हरमध्ये 5 विकेट्सच्या मोबदल्यात 229 धावा केल्या. हैदराबादचा हा एकूण पाचवा तर पॅट कमिन्स याच्या नेतृत्वातील पहिला विजय ठरला. हैदराबाद यासह पाचवा सामना जिंकणारी या मोसामतील चौथी टीम ठरली. तर राजस्थान रॉयल्सचा हा एकूण तिसरा पराभव ठरला.

सामन्यात काय झालं?

हैदराबादने टॉस जिंकून राजस्थानला बॅटिंगसाठी बोलावलं. राजस्थानने या संधीचा फायदा घेतला. युवा वैभव सूर्यवंशी याने आयपीएल कारकीर्दीतील हैदराबाद विरुद्ध पहिलं शतक झळकावलं. वैभवचं सवाई मानसिंह स्टेडियम आणि आयपीएल कारकीर्दीतील हे दुसरं शतक ठरलं. वैभवने 37 चेंडूत 103 धावा केल्या. वैभवने या खेळीत 12 षटकार आणि 5 चौकार लगावले. तसेच ध्रुव जुरेल याने 51 धावांचं योगदान दिलं. वैभव आणि ध्रुव या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी केलेल्या 112 धावांच्या भागीदारीच्या जोरावर राजस्थानला 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 228 धावांपर्यंत पोहचता आला. तसेच इतरांनीही योगदान दिलं. हैदराबादसाठी एशान मलिंगा याने सर्वाधिक 2 विकेट्स मिळवल्या.

हैदराबादची बॅटिंग

राजस्थानने विजयी धावांचा पाठलाग करायला आलेल्या हैदराबादला 7 धावांवर पहिला झटका दिला. जोफ्रा आर्चर याने ट्रेव्हीस हेड याला 6 धावांवर बाद केलं. त्यानंतर अभिषेक शर्मा आणि इशान किशन या दोघांनी कमाल केली. इशान आणि अभिषेकने दुसऱ्या विकेटससाठी 55 बॉलमध्ये 132 रन्सची पार्टनरशीप केली. या भागीदारीच्या मदतीने हैदराबादने सामन्यावर घट्ट पकड मिळवली. अभिषेक शर्मा आऊट झाल्याने ही जोडी फुटली. अभिषेकने 29 बॉलमध्ये 11 चौकार आणि 1 सिक्ससह 57 धावा केल्या.

स्कोअरकार्ड


अभिषेकनंतर काही षटकांच्या अंतराने इशान किशनही आऊट झाला. इशानने हैदराबादसाठी सर्वाधिक धावा केल्या. इशानने 74 धावांचं योगदान दिलं. मधल्या फळीत हेन्रिक क्लासेन आणि नितीश कुमार रेड्डी या दोघांनी निर्णायक खेळी केली. हेन्रिकने 29 धावा जोडल्या. तर नितीशने 36 धावांचं योगदान दिलं.सलील अरोरा आणि अनिकेत वर्मा या दोघांनी उर्वरित धावा करुन हैदराबादला विजयापर्यंत पोहचवलं. सलिलने नाबाद 8 धावा केल्या. तर अनिकेतने नॉट आऊट 1 रन केली. राजस्थानसाठी जोफ्रा आर्चर आणि ब्रिजेश शर्मा या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर डोनोवन फरेरा याने 1 विकेट मिळवली.

Follow Us