IPL 2024 Points Table : आरसीबी 1 महिन्याने विजयी, पॉइंट्स टेबलमध्ये किती फायदा?

| Updated on: Apr 25, 2024 | 11:41 PM

IPL Points Table 2024 SRH vs RCB : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आयपीएलच्या 17 व्या मोसमात तब्बल 1 महिन्यानंतर विजय मिळवला आहे. आरसीबीचा हा दुसरा विजय ठरला आहे. या विजयानंतर जाणून घ्या पॉइंट्स टेबलमध्ये कोण कुठे आहे?

IPL 2024 Points Table : आरसीबी 1 महिन्याने विजयी, पॉइंट्स टेबलमध्ये किती फायदा?
rcb team ipl,
Image Credit source: BCCI/IPL
Follow us on

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आयपीएलच्या सलग 6 पराभवानंतर विजय मिळवला आहे. आरसीबीसमोर आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 41 व्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादचं आव्हान होतं. आरसीबीने हैदराबादला विजयासाठी 207 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र हैदराबादला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 171 धावाच करता आल्या. हैदराबादकडून एकालाही मोठी खेळी करता आली नाही. काहींना सुरुवात मिळाली, मात्र त्यांना त्या खेळीचं मोठ्या आकड्यात रुपांतर करता आलं नाही. या सामन्यातील दोन्ही डावात काय झालं? हे जाणून घेतल्यानतंर आपण पॉइंट्स टेबलबाबत जाणून घेऊयात.

हैदराबादकडून पॅट कमिन्स आणि अभिषेक शर्मा या दोघांनी प्रत्येकी 31 धावा केल्या. तर शाहबाज अहमद याने नाबाद 40 धावांचं योगदान दिलं. नितीश रेड्डी आणि भुवनेश्वर कुमार या दोघांनी 13-13 धावा केल्या. अब्दुल समदने 10 धावांचं योगदान दिलं. तर इतरांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. आरसीबीकडून स्वप्नील सिंह, कर्ण शर्मा आणि कॅमरुन ग्रीन या तिघांनी 2-2 विकेट्स घेतल्या. तर विल जॅक्स आणि यश दयाल या दोघांच्या खात्यात 1-1 विकेट गेली. आरसीबीने अशाप्रकारे हा सामना जिंकला. आरसीबीचा हा या 17 व्या हंगामातील दुसरा विजय ठरला.

आरसीबीची बॅटिंग

त्याआधी आरसीबीने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. आरसीबीने रजत पाटीदार आणि विराट कोहली या दोघांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर 200 पार मजल मारली. विराट कोहली याने 51 तर रजत पाटीदार याने 50 धावा केल्या. तर कॅमरुन ग्रीन याने 20 बॉलमध्ये 37 धावांची नाबाद खेळी केली. कॅप्टन फाफ डु प्लेसीस याने 25 धावांचं योगदान दिलं. अखेरीस दिनेश कार्तिक याने 11 आणि स्वप्नील सिंह याने 12 धावा जोडल्या. तर इतर दोघांना दुहेरी आकडाही गाठला नाही. आरसीबीने अशाप्रकारे 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 206 धावा केल्या. तर हैदराबादकडून जयदेव उनाडकट याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. टी नटराजन याने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर पॅट कमिन्स आणि मयंक मार्कंडे या दोघांच्या खात्यात 1-1 विकेट गेली.

पॉइंट्स टेबलमध्ये कोण कुठे?

आरसीबीच्या विजयानंतरही पॉइंट्स टेबलमधील परिस्थितीत जैसे थेच आहे. आरसीबी या विजयानंतरही दहाव्या आणि हैदराबाद पराभवानंतर तिसऱ्या स्थानी कायम आहे. मात्र नेट रनरेटच्या बाबतीत आरसीबीला फायदा आणि हैदराबादला तोटा झाला आहे. या सामन्याआधी आरसीबाचा नेट रनरेट हा -1.046 असा होता तो विजयानंतर -0.721 असा आहे. तर हैदराबादचा नेट रनरेट सामन्याआधी 0.914 इतका होता तो पराभवानंतर 0.577 असा आहे. तर राजस्थान रॉयल्स अव्वल स्थानी कायम आहे.

सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कर्णधार), अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), नितीश रेड्डी, अब्दुल समद, शाहबाज अहमद, भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, मयंक मार्कंडे आणि टी नटराजन.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु प्लेइंग ईलेव्हन : फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, कॅमेरॉन ग्रीन, विल जॅक्स, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद सिराज आणि यश दयाल.