IRE vs WI : विंडीजचा धमाका, आयर्लंडचा 62 धावांनी धुव्वा, सामन्यासह मालिकाही जिंकली
Ireland vs West Indies 3rd T20I Match Result : वेस्ट इंडिजने शाई होप याच्या नेतृत्वात तिसऱ्या सामन्यात पहिलावहिला विजय मिळवत मालिका जिंकली.

वेस्ट इंडिज क्रिकेट टीमला इंग्लंड दौऱ्यात एकही सामना जिंकता आला नाही. विंडीजने वनडे आणि टी 2OI मालिका गमावली. त्यानंतर विंडीज विरुद्ध आयर्लंड यांच्यात 3 सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना रविवारी 15 जून रोजी खेळवण्यात आला. उभयसंघातील पहिले 2 सामने हे पावसामुळे रद्द करावे लागले. त्यामुळे तिसरा आणि अंतिम सामना जिंकून दोन्ही संघांना मालिका विजयाची संधी होती. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये चुरस पाहायला मिळणार होती. मात्र विंडीजने टी 20I सामन्यात वनडेसारखा स्कोअर केला आणि पहिल्याच डावात विजय निश्चित केला आणि मालिका आपल्या नावावर करण्यात यश मिळवलं.
विंडीजने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 256 रन्स केल्या. प्रत्युत्तरात आयर्लंडनेही जोरदार प्रतिकार केला. मात्र त्यांचे प्रयत्न अपुरे ठरले. आयर्लंडला 7 विकेट्स गमावून 194 धावांपर्यंतच पोहचता आलं. विंडीजने अशाप्रकारे 62 धावांनी हा सामना जिंकला. विंडीजने यासह 3 सामन्यांची मालिका 1-0 अशा फरकाने जिंकली. आयर्लंडने टॉस जिंकून विंडीजला बॅटिंगसाठी भाग पाडलं. विंडीजने या संधीचा पूर्ण फायदा घेत आयर्लंडच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली.
एविन लेव्हीस आणि कॅप्टन शाई होप या दोघांनी 122 धावांची सलामी भागीदारी करुन विंडीजला कडक सुरुवात करुन दिली. शाई होप याने 27 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 4 फोरसह 51 रन्स केल्या. तिसऱ्या स्थानी आलेला रोव्हमॅन पॉवेल 2 धावा करुन माघारी परतला. लेव्हीसला शतकाची संधी होती. मात्र तो नर्व्हस नाईंटीचा शिकार ठरला. लेव्हीसने 44 बॉलमध्ये 8 सिक्स आणि 7 फोरसह 91 रन्स केल्या. शिमरॉन हेटमायर याने 15 धावा जोडल्या. जेसन होल्डरने 18 रन्स केल्या.
केसी कार्टी आणि रोमरियो शेफर्ड या दोघांनी सहाव्या विकेटसाठी शेवटच्या 9 बॉलमध्ये 37 रन्स ठोकल्या आणि विंडीजला 256 धावांपर्यंत पोहचवलं. कार्टीने 22 बॉलमध्ये 4 फोर आणि 4 सिक्ससह नॉट आऊट 49 रन्स केल्या. तर रोमरियो शेफर्डने नाबाद 19 धावा केल्या. आयर्लंडसाठी मॅथ्यू हम्फ्रीज याने 2 विकेट्स घेतल्या. तर मार्य अडायर, बॅरी मकार्थी आणि बेंजामिन व्हाईट या तिघांनी 1-1 विकेट घेतली.
आयर्लंडची बॅटिंग
आयर्लंडकडून अनेकांना अपेक्षित सुरुवात मिळाली. मात्र 250 पेक्षा अधिक धावांचं आव्हान पाहता विजयासाठी एकाकडून तरी मोठी खेळी हवी होती.आयर्लंडकडून तशी एकालाही मोठी खेळी करता आली नाही. मात्र आयर्लंडने सहजासहजी हार मानली नाही. आयर्लंड लढून हरली.
कर्णधार पॉल स्ट्रलिंग याने 13 धावा केल्या. रोस अडायर याने सर्वाधिक 48 धावांचं योगदान दिलं. हॅरी टेक्टरने 38 रन्स केल्या. जॉर्ज डॉकरेलने 15 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. तर मार्क अडायर आणि लियाम मॅकार्थी ही जोडी नाबाद परतली. अडायरने 31 तर लियामने 16 रन्स केल्या. त्या व्यतिरिक्त तिघांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. विंडीजसाठी अकील हौसेन याने तिघांना बाद केलं. जेसन होल्डरने 2 विकेट्स मिळवल्या. तर रोमरियो शेफर्ड आणि रोस्टन चेज या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.
