Cricket : टी 20i वर्ल्ड कपसाठी दिग्गजच कर्णधार, 12 खेळाडू कायम, तिघांना पहिल्यांदाच संधी
Icc T20i World Cup 2026 : आयसीसी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत एकूण 20 संघ खेळणार आहेत.वर्ल्ड कपसाठी बी ग्रुपमधील आणखी एक संघाची घोषणा करण्यात आली आहे.

भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या आगामी आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेसाठी (Icc T20i World Cup 2026) आणखी एका संघाची घोषणा करण्यात आली आहे. या 10 व्या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत एकूण 20 संघ सहभागी होणार आहेत. आता आयर्लंड क्रिकेट संघाकडून या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी 15 खेळाडूंची नावं जाहीर करण्यात आली आहेत. आयर्लंड क्रिकेट आणि आयसीसीने याबाबतची माहिती एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन दिली आहे. आयर्लंड क्रिकेट बोर्डाने दिग्गजालाच कर्णधारपदी कायम ठेवलं आहे. तसेच कोणत्या खेळाडूंचा पहिल्यांदाच वर्ल्ड कप स्पर्धेत समावेश केला आहे, हे जाणून घेऊयात.
पॉल स्टर्लिंग कर्णधारपदी
आयर्लंडचा अनुभवी आणि सलामी फलंदाज पॉल स्टर्लिंग हाच नेतृत्व करणार आहे. पॉलने गेल्या वर्ल्ड कपमध्येही आयर्लंडचं नेतृत्व केलं होतं. तसेच लॉर्कन टकर हा उपकर्णधार म्हणून जबाबदारी पार पाडणार आहे.
12 खेळाडू कायम, तिघांना पहिल्यांदाच संधी
आयर्लंड क्रिकेट बोर्डाच्या निवड समितीने यंदा गेल्या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील 15 पैकी 12 खेळाडूंना संघात कायम ठेवलं आहे. तर तिघांना पहिल्यांदाच संधी दिली आहे. या तिघांमध्ये टीम टेक्टर, बेन कॅलिट्झ आणि मॅथ्यू हम्फ्रीज यांचा समावेश आहे.
आयर्लंडची वर्ल्ड कप स्पर्धेत सहभागी होण्याची यंदाची सलग आणि एकूण नववी वेळ आहे. आयर्लंड 2009 पासून सातत्याने स्पर्धेत खेळत आहे. मात्र आयर्लंडला एकदाही उपांत्य फेरीपर्यंत पोहचता आलेलं नाही. मात्र आयर्लंडने या स्पर्धेत अनेक संघांना पराभवाचं पाणी पाजलंय. त्यामुळे आयर्लंड यंदा कोणत्या टीमचा गेम करणार? याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
आयर्लंड कोणत्या ग्रुपमध्ये?
दरम्यान आयर्लंड टीमचा या स्पर्धेसाठी बी ग्रुपमध्ये समावेश करण्यात आला आहे. आयर्लंडसह या ग्रुपमध्ये श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, झिंबाब्वे आणि ओमानचा समावेश आहे. आयर्लंड या मोहिमेतील आपला पहिला सामना 8 फेब्रुवारीला श्रीलंकेविरुद्ध खेळणार आहे.
आयर्लंड टीममध्ये कोण कोण?
A well-rounded outfit will carry Ireland’s hopes at the Men’s #T20WorldCup 2026 👏
Details ⬇️https://t.co/irmHmZUl2M
— ICC (@ICC) January 9, 2026
आयर्लंडचं वेळापत्रक
विरुद्ध श्रीलंका, 8 फेब्रुवारी
विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 11 फेब्रुवारी
विरुद्ध ओमान, 14 फेब्रुवारी
विरुद्ध झिंबाब्वे, 17 फेब्रुवारी
आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेसाठी आयर्लंड टीम : पॉल स्टर्लिंग (कर्णधार), लॉर्कन टकर (उपकर्णधार), मार्क अडायर, रॉस अडायर, बेन कॅलिट्झ, कर्टिस कॅम्फर, गॅरेथ डेलानी, जॉर्ज डॉकरेल, मॅथ्यू हम्फ्रीज, जॉश लिटिल, बॅरी मॅकार्थी, हॅरी टेक्टर, टिम टेक्टर, बेन व्हाइट आणि क्रेग यंग.
