Video : संजू सॅमसनसोबत काही बिनसलं आहे का? अखेर राहुल द्रविड यांनी खरं काय ते सांगून टाकलं

आयपीएल 2025 स्पर्धेदरम्यान राजस्थान रॉयल्सचा प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार संजू सॅमसन यांच्यात वाद झाल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. एका व्हायरल व्हिडीओमुळे अनेकांना यात तथ्यही वाटत आहे. यावर प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. त्यामुळे आता या चर्चांना पूर्णविराम लागला आहे.

Video : संजू सॅमसनसोबत काही बिनसलं आहे का? अखेर राहुल द्रविड यांनी खरं काय ते सांगून टाकलं
राहुल द्रविड
Image Credit source: video grab/IPL/Twitter
| Updated on: Apr 19, 2025 | 5:10 PM

आयपीएल 2025 स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात अतितटीचा सामना रंगला. हा सामना बरोबरीत सुटल्याने सुपर ओव्हरमध्ये गेला. मात्र या सुपर ओव्हरमध्ये दिल्ली कॅपिटल्सने राजस्थानला पराभूत केलं. त्यामुळे राजस्थान रॉयल्सचं प्लेऑफचं गणित अजून लांबलं आहे. असं असताना मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार संजू सॅमसन यांच्यात काहीतरी बिनसल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे संघावर त्याचा परिणाम होत असल्याचं बोललं जात आहे. त्यानंतर एका व्हायरल व्हिडीओनंतर खरंच असं काही झाल्याचं अनेकांना वाटत आहे. त्यात दोन्ही बाजूने काहीच स्पष्टीकरण नसल्याने अनेकांना तसंच खरं असल्याचं वाटलं. पण मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी यावर स्पष्टीकरण दिलं असून अफवेचा उडालेला धुराळा शांत केला आहे. सुपर ओव्हरपूर्वी, राहुल द्रविड त्याच्या सहकाऱ्यांशी आणि सपोर्ट स्टाफशी बोलताना दिसत आहे. मिचेल स्टार्कचा सामना करण्यासाठी कोणाला पाठवायचं वगैरे वगैरे.. पण संजू सॅमसन या चर्चेत कुठेच नव्हता आणि डगआऊटजवळ फिरत होता.

सुपर ओव्हरसाठी महत्त्वाची चर्चा होत असताना कर्णधार असा लांब का? असा प्रश्न अनेकांना पडला. यावेळी एका खेळाडूने संजू सॅमसनला चर्चेत सहभागी होण्यासाठी इशारा केला. तेव्हा संजू सॅमसनने त्याला नकार दिला आणि इशारा करत म्हणाला की, नाही येत. सामन्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर संजू सॅमसन आणि राहुल द्रविड यांच्यात वाद झाल्याच्या चर्चांना उधाण आलं. पण मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी या अफवा असल्याचं सांगत त्यावर पडदा टाकला आहे.

राजस्थान रॉयल्सचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत सांगितले की, ‘अशा बातम्या कुठून येतात हे मला माहित नाही. संजू आणि मी एकाच टीममध्ये आहोत. ते आमच्या संघाचा खूप महत्त्वाचा भाग आहेत. ते प्रत्येक संघाच्या चर्चेत आणि निर्णयात सहभागी असतात. कधीकधी, जेव्हा तुम्ही सामना हरता आणि गोष्टी व्यवस्थित होत नाहीत, तेव्हा तुम्हाला टीकेला सामोरे जावे लागते. पण या निराधार चर्चेबद्दल आपण काहीही करू शकत नाही. संघातील वातावरण खूप चांगले आहे.’

राजस्थान रॉयल्सचा पुढचा सामना लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध होईल. त्यामुळे संपूर्ण संघाचे लक्ष सलग तीन पराभवांची मालिका तोडण्यावर असेल. राजस्थान रॉयल्स सध्या पॉइंट्स टेबलमध्ये आठव्या स्थानावर आहे. दरम्यान, कर्णधार संजू सॅमसन या सामन्यात खेळणार की नाही याबद्दल काहीच कळालेलं नाही. हाताच्या दुखापतीमुळे संजू सॅमसनला मागच्या सामन्यात रिटायर्ड हर्ट झाला होता.