इशान किशन दुलीप ट्रॉफी स्पर्धेतून बाहेर! टीम इंडियात पुनरागमन कठीण? जाणून घ्या काय झालं ते
इशान किशनचं टीम इंडियात पुनरागमन करण्यासाठी धडपड करत आहे. देशांतर्गत बुची बाबू स्पर्धेतही त्याने नशिब आजमावलं. आता दुलीप ट्रॉफी स्पर्धेत खेळणार होता. पण त्याच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. इशान किशन दुलीप ट्रॉफी स्पर्धेतून आऊट झाला आहे. फक्त एकाच सामन्यातून की संपूर्ण सीरिजमधून ते काही स्पष्ट झालेलं नाही.
इशान किशनने दक्षिण अफ्रिका दौरा अर्धवट सोडला आणि तारेच फिरले असं म्हणावं लागेल. कारण तेव्हापासून आतापर्यंत इशान किशन टीम इंडियात पुनरागमनासाठी धडपड करताना दिसत आहे. सुरुवातीला देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास टाळाटाळ करत होता. पण बीसीसीआयने कारवाईचा बडगा उचलल्यानंतर देशांतर्गत क्रिकेट खेळताना दिसला. देशांतर्गत बुची बाबू स्पर्धेत त्याने झारखंड संघाचं नेतृत्व केलं. त्याचबरोबर दुलीप ट्रॉफी स्पर्धेतही इंडिया डी संघात इशान किशनचं नाव आहे. या स्पर्धेवर त्याचं भवितव्य ठरणार होतं. पण आता त्याच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. इशान किशन 5 सप्टेंबरला सुरु होणाऱ्या दुलीप ट्रॉफी स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यातून बाहेर गेला आहे. रिपोर्टनुसार, इशान किशन पहिल्या सामन्यात खेळणार नसल्याचं सांगितलं जात आहे. इशान किशन बाहेर का गेला? फक्त एकच सामना खेळणार नाही की पुढेही स्पर्धेला मुकणार? असे अनेक प्रश्न पडले आहे. क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, दुलीप ट्रॉफीतून इशान किशन बाहेर जाण्याचं कारण दुखापतीशी निगडीत असावं असं सांगितलं आहे.
दुलीप ट्रॉफी स्पर्धे इंडिया डी संघाची धुरा श्रेयस अय्यरच्या हाती आहे. जर या स्पर्धेतील पहिला सामना इशान खेळत नसेल तर त्याच्या जागी संजू सॅमसनला संघात घेतलं जाण्याची शक्यता आहे. यापूर्वी दुलीप ट्रॉफी संघाची घोषणा झाली तेव्हा संजू सॅमसनचं त्यात नाव नव्हतं. त्यामुळे त्याच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो. दरम्यान, इशान किशन दुलीप ट्रॉफी स्पर्धेच्या पुढच्या सामन्यात खेळणार की नाही हे देखील अस्पष्ट आहे. त्यामुळे भारत-बांग्लादेश कसोटी मालिकेतही त्याची निवड होणं कठीण दिसत आहे. कारण या मालिकेसाठी निवड दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यानंतर होणार आहे. त्यामुळे इशान किशनला या मालिकेत संधी मिळणं कठीण आहे.
इशान किशनची निवड बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यात झाली नाही तर दुलीप ट्रॉफीच्या उर्वरित सामन्यात खेळेल, असंही सांगण्यात येत आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वात इंडिया डी संघाचा दुसरा सामना 12 सप्टेंबरला आहे. इशान किशनने बुची बाबू स्पर्धेत चांगली कामगिरी केली होती. मध्य प्रदेशविरुद्ध पहिल्याच सामन्यात 86 चेंडूत शतकी ठोकलं होतं. त्यामुळे त्याचा फॉर्म असल्याचं दिसून येत आहे. पण या जोरावर टीम इंडियात पुनरागमन कठीण दिसत आहे.