
भारताचा स्टार फलंदाज यशस्वी जयस्वाल सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. कारण टी20 मालिका आणि टी20 वर्ल्डकप स्पर्धेत त्याची निवड काही झालेली नाही. त्यामुळे देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळण्याशिवाय पर्याय नाही. अनेक दिग्गज खेळाडू सध्या रणजी ट्रॉफीत खेळत आहेत. भारताचा कसोटी आणि वनडे कर्णधार शुबमन गिल देखील रणजी ट्रॉफी स्पर्धेत खेळत आहे. पण यशस्वी जयस्वाल रणजी ट्रॉफीचा भाग नाही. रणजी ट्रॉफीच्या पुढच्या लीग सामन्यासाठी निवडलेल्या संघात जयस्वालला डावलण्यात आलं आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवड समितीने दिल्ली विरुद्ध होणाऱ्या सामन्यात यशस्वी जयस्वालची निवड केली नाही. त्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. त्यामुळे त्याला दुखापत झाली असावी, असा अंदाज अनेकांनी बांधला आहे. रिपोर्टनुसार, जयस्वाल अजूनही फिट नाही आणि त्याला वैद्यकीय तपासणीचा सल्ला दिला गेला आहे. त्यामुळे मुंबईच्या पुढच्या रणजी ट्रॉफी सामन्यातही खेळणार नाही.
रिपोर्टनुसार, यशस्वी जयस्वाल आजारी होता. त्यातून अजूनही बरा झालेला नाही. त्याने नुकतीच डॉक्टरांची भेट घेतली होती. त्यानंतर त्याला पुढच्या तपासणीचा सल्ला दिला गेला आहे. आता त्याच्या तब्येतीत सुधारणा होत असली तरी पूर्णपणे फिट नाही. त्यामुळे पुढचे दोन आठवडे औषधं सुरु ठेवावी लागणार आहेत. तसेच जमेल तसा सराव करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे यशस्वी जयस्वाल थेट आता 6 फेब्रुवारीला होणाऱ्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात खेळेल अशी चर्चा रंगली आहे.
डिसेंबर 2025 मध्ये सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेदरम्यान यशस्वी जयस्वावला गॅस्टोअँटरायटिसचा त्रास झाला होता. त्यामुळे त्याला सामना अर्धवट सोडवा लागला होता. त्यानंतर काही दिवस त्याच्यावर रुग्णालयात उपचार झाले. सावरल्यानंतर भारत न्यूझीलंड वनडे मालिकेत परतला. पण त्याला प्लेइंग 11 मध्ये काही स्थान मिळालं नाही. आता रणजी ट्रॉफी खेळेल अशी चर्चा असताना त्याला तब्येतीत पुन्हा बिघाड झाला आहे. त्याला पुन्हा एकदा पोटदुखीचा त्रास जाणवू लागला आहे. त्यानंतर त्याने पुन्हा एकदा डॉक्टरांचा सल्ला घेतला आहे.